Solapur, 15 July : मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातील यशस्वी दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे भगवे वादळ पश्चिम महाराष्ट्रात घोंगावणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे. सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या बैठकीतून ही माहिती देण्यात आली.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती आणि शांतता रॅली सध्या मराठवाड्यातून मार्गक्रमण करीत आहे. मराठवाड्यात (Marathwada) मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील हे नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधकांवर तुटून पडत आहेत. विशेषतः त्यांच्या भाषणाचा रोख हा छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस आणि भाजप असाच राहिला आहे.
मराठवाड्यात होत असलेल्या यशस्वी आणि भव्य सभांना मिळत असलेल्या प्रतिसादानंतर जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जागृती व शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात काढणार असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतची तारीख या सभेसाठी निश्चित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणारी सभा ही यापूर्वीच्या रॅली आणि सभेपेक्षा मोठी करण्याचे निर्धार सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आला. सोलापुरातील सभा यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गावागावांत बॅनर लावून जनजागृती करण्यात येणार आहे. या सभेसाठी इतर समाज बांधवांनाही विश्वासात घेण्याचा निर्णय सोलापुरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
सोलापूर शहरातील वॉर्डा वॉर्डात जाऊन मराठा आरक्षण जनजागृती करण्यात येणार आहे. सोलापुरात होणारी सभा ही 2016 च्या मोर्चापेक्षा मोठी करण्याचा निर्धार सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला राजन जाधव, श्रीरंग लाळे, माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, प्रशांत पाटील, प्रा. गणेश देशमुख, डॉ. प्रमोद पाटील, बालाजी सिरसट, गोविंद पाटील, विश्वास डोंगरे आदी उपस्थित होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.