Khandali Maratha community Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात मराठा समाज भाजपविरोधात आक्रमक; वडवळमध्ये सातपुतेंना विरोध, खंडाळीत पदाधिकाऱ्याचा निषेध

Maratha community News : आक्रमक झालेल्या मराठ्यांनी ‘चले जाव, चले जाव’च्या घोषणा दिल्या. आक्रमक मराठा समाज पाहून आमदार राम सातपुते यांनी वडवळला येण्याचे टाळले. त्यावरही मराठा समाजाकडून टीका करण्यात आली. आमच्या भावना समजून घेण्यासाठी सातपुते यांनी वडवळमध्ये यायला हवे होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 09 April : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध करण्यात आला, तर मोहोळ येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे पदाधिकारी शंकर वाघमारे यांनी केलेल्या विधानाचा खंडाळी येथे निषेध मराठा समाजाकडून करण्यात आला. त्यामुळे भाजप उमेदवार सातपुते यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या प्रचाराचा मोहोळ तालुक्यातील वडवळ (Wadval) येथील नागनाथाच्या मंदिरात शुभारंभ करण्यात येणार होता. ही गोष्ट समजताच मराठा नागरिक सकाळपासूनच मंदिर परिसरात जमू लागले होते. सातपुते वडवळमध्ये पोहोचण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे हे कार्यक्रमस्थळी पोचले होते. त्यावेळी त्यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांना समाज बांधवांच्या वतीने जाब विचारण्यात आला. आक्रमक झालेल्या मराठ्यांनी ‘चले जाव, चले जाव’च्या घोषणा दिल्या. आक्रमक मराठा समाज (Maratha community) पाहून आमदार राम सातपुते यांनी वडवळला येण्याचे टाळले. त्यावरही मराठा समाजाकडून टीका करण्यात आली. आमच्या भावना समजून घेण्यासाठी सातपुते यांनी वडवळमध्ये यायला हवे होते. आमचे मत विचारात घेण्याची गरज असताना त्यांनी मराठा समाजाला टाळले, अशी प्रतिक्रिया मराठा समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आली.

मराठा समन्वयक ॲड. श्रीरंग लाळे म्हणाले, भाजपचे मोहोळमधील शंकर वाघमारे यांनी वडवळच्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने वडवळमध्ये मराठा समाजाने तमाशा मांडला, गोंधळ घातला, असे विधान केले होते. अंतरवाली सराटीतील लाठीहल्ल्यानंतरही मराठा समाज संविधानिक मार्गाने आंदोलन करत होता. त्यानंतरही भाजप पदाधिकारी शंकर वाघमारे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मोहोळच्या मेळाव्यात मराठा समाजाने आंदोलनाच्या माध्यमातून तमाशा मांडला, असे विधान केले आहे, त्याचा खंडाळी येथे मराठा बांधवांनी जाहीर निषेध केला.

जोपर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्ष, मोहोळचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी शंकर वाघमारे हे जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंंत मराठा समाज भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाहीत. खंडाळीतील मराठा बांधव निषेध करत होते, त्यावेळी पोलिस आणि सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, असा आरोप मराठा समन्वयक ॲड. लाळे यांनी केला.

मराठा समाजाचा भाजपला वैयक्तिक विरोध नाही. मात्र, कोणी आमच्या समाजाबद्दल असे वक्तव्य करत असतील, तर मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात येईल, असेही लाळे यांनी स्पष्ट केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT