Sangli, 09 April : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभेची जागा अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच कायम राहणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसची विशेषतः विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सांगली मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency ) ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या (ता. 10 एप्रिल) बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती सांगलीचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत जागा वाटप जाहीर केले. त्यात सांगलीची (Sangli) जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असणार हे निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मिरजेत मेळावा झाला होता. त्या मेळाव्यातून त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचे रणशिंंग फुंकले होते. त्या मेळाव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार घातला होता.
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दंड थोपटले होते. विशेषतः आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) आणि सांगलीतील इच्छुक विशाल पाटील (Vishal Patil) यांनी थेट दिल्लीपर्यंत धाव घेतली होती. हायकमांडपर्यंत जाऊनही सांगलीवरील दावा ठाकरे यांनी सोडला नाही. उलट चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या संजय राऊत यांनी सांगलीची जागा काँग्रेसने विसरावी, असे विधान केले होते.
संजय राऊत यांच्या विधानावर विश्वजित कदम म्हणाले, संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. सांगलीतील एखाद्या जनावराला विचारलं तर तो सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे, असा टोला विश्वजित कदम यांनी लगावला होता. त्यानंतरही ही ठाकरेंनी ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या (ता. १० एप्रिल) सकाळी अकरा वाजता बैठक बोलावली आहे. आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे सांगलीचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय विशाल पाटील घेतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.