Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video-Sharad Pawar : मराठा आंदोलकांनी कुर्डूवाडीजवळ अडवली शरद पवारांची गाडी

Vijaykumar Dudhale

Solapur, 11 August : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गाडी मराठा आरक्षण आंदोलकांनी माढा तालुक्यातील कुर्डूवाडीजवळ अडवली. मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.

त्यावेळी शरद पवार यांनी ‘आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे’, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पवार हे पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

शरद पवार (Sharad Pawar) हे आज बार्शीच्या दौऱ्यावर असून शेतकरी मेळाव्यासाठी बार्शीकडे रवाना झाले आहेत. टेंभुर्णीमार्गे ते बार्शीकडे जात असताना कुर्डूवाडीजवळ आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. आंदोलकांनी पवार यांना मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. आजच्या मेळाव्यात आपण मराठा आरक्षणाबाबत आपल्या पक्षाचे म्हणणे जाहीर करावे, अशी मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.

त्यावेळी शरद पवार यांनी आपला मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. मराठा आंदोलकांना आपली भूमिका सांगितनंतर शरद पवार हे पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहेत.

बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठी ते आज बार्शीला आले आहेत. त्यानंतर पवारांचा सोलापूर शहरातही दौरा असून ते एका मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघ हा एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मागील विधानसभा निवडणूक लढविली होता, त्या निवडणुकीत वैरागचे माजी नगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी विधानसभा निवडणूक लढवित माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या पराभवाला हातभार लावला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या सोपल यांचा पराभव करण्यात शरद पवार हे यशस्वी ठरले होते.

आता विश्वास बारबोले हे विधानसभेसाठी इच्छुक असून आजचा मेळावा त्या अनुषंगानेच होत आहे, त्यामुळे आजच्या मेळाव्यात शरद पवार हे बारबोले यांच्या उमेदवारीसंदर्भात आणि बार्शी मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाच्या ताब्यात जाणार, याबाबत या मेळाव्यतून संकेत देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT