Vishwajeet Kadam and Chandrahar Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : विश्वजीत कदम, चंद्रहार पाटलांकडून मराठा आंदोलकांसाठी गाड्या, रेल्वे तिकीट अन् राहण्याची सोय!

Vishwajeet Kadam and Chandrahar Patil : आरक्षणासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत.

Anil Kadam

Sangali News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते गाड्यातून मुंबईस रवाना होत आहेत. तर मराठा आंदोलनास बळ देण्यासाठी काँग्रेसचे नेते व आमदार विश्वजीत कदम आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही बळ दिले आहे.

कदम यांनी पुणे आणि मुंबईत भारती विद्यापीठ परिसरात राहण्याचे आणि जेवणाची सोय केली आहे. तर चंद्रहार पाटील यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेची आणि तरुणांसाठी गाड्या देऊन मुंबईकडे जाण्यास मदत केली जात आहेत.

मराठा समाजाला आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन तीव्र होत आहे. राज्यातील इतर भागाप्रमाणे सांगलीतही मराठा समाजातर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर मराठा स्वराज संघटनेतर्फे येथे लाक्षणिक उपोषण ही करण्यात आले होते. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबईस जात आहेत. त्याप्रमाणे सांगलीतही मुंबईत जाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार नियोजन सुरू आहे. लोकांच्या जनजागृती होण्यासाठी रविवारी सांगलीसह जिल्ह्यातील विविध भागात मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणासाठी जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत असताना या आंदोलकांना आता राजकीय नेत्यांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम(Vishwajeet Kadam) यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या आंदोलकांची पुणे आणि मुंबई येथील भारती विद्यापीठ परिसरामध्ये जेवण आणि राहण्याची सोय केली आहे. जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या परिसरात राहतील, अशी व्यवस्था करून आंदोलकांची गैरसोय होणार नाही, याबाबतची दक्षता कदम यांच्याकडून घेतली जात आहे. मराठा आंदोलकांची सोय करताना आमदार कदम हे स्वतः लक्ष घालून नियोजित करीत आहेत.

याशिवाय मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वेची व्यवस्था केलेली आहे. गुरुवारी रात्री सांगलीतून 55 वर्षावरील कार्यकर्ते रेल्वेने मुंबईस जाणार आहेत. त्यांना तिकीट काढून देण्यात येणार आहे. याशिवाय मुंबईस जाण्यासाठी कार्यकर्त्यांकडून गाड्यांचे नियोजन केले गेले आहे.

जिल्ह्यातून मंगळवारपासून हे कार्यकर्ते मुंबईस जात असून बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईस रवाना झाले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. लोणावळा येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. तेथून ते मुंबईत दाखल होणार आहेत. सांगली बरोबर सर्वच तालुक्यातून कार्यकर्त्यांनी मुंबईत जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT