pune municipal corporation commissioner Nawal Kishore Ram And MNS Kishor Shinde  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मनसेचा नेता थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेला अन् म्हणाला, 'घरात घुसून...'; आयुक्तही भडकत म्हणाले, 'तुम्ही गुंड...'

marathi vs non marathi language clash : पुणे महापालिकेत महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि आयुक्तांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. मनसेने घातलेल्या रोड्यानंतर आयुक्तही चांगलेच संतापल्याचे आता समोर आले आहे.

Sudesh Mitkar

Summary :

  1. पुणे महापालिकेतील बैठकीत मनसे पदाधिकारी जबरदस्तीने घुसल्यानंतर आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

  2. वादग्रस्त घटनेला मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  3. राज्यात आधीच मराठी अस्मिता विषय तापलेला असताना, पुण्यातील या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

Pune News : राज्यभर चाललेल्या मराठी अमराठीचा वाद आता पुणे महापालिकेमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाल. महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असतानाच मनसेचे काही पदाधिकारी थेट बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं सांगत या पदाधिकाऱ्यांना हटकलं असता आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

हा वाद इतका विकोपाला गेला की मनसेच्या नेत्याने थेट आयुक्तांच्या अंगावर धाव घेतली. यामुळे क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आयुक्तांनी देखील उत्तर देताना तुम्ही लोक महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात असे म्हटल्याने वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यामुळे महापालिकेत झालेल्या या वादाला आता मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग चढण्याची शक्यता असून राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

असा घडला घटनाक्रम

आयुक्त नवल किशोर राम हे स्वच्छता अभियानासंदर्भात 30 ते 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. अशातच मनसेचे नेते किशोर शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसह दालनात घुसले. अचानक घोळका आल्याने आयुक्तांनी विचारले, "तुमचे काम काय आहे?" यावर शिंदे म्हणाले, "मी माजी नगरसेवक आहे. मी चार वेळा विधानसभा निवडणुकीत देखील लढली असल्याचं त्यांनी आयुक्तांना सांगितलं." त्यावर आयुक्तांनी त्यांना बैठक सुरू असून तुमचं काय काम आहे ते सांगा असं विचारलं. यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी थेट आयुक्तांच्या खुर्चीकडे धाव घेत त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.

यावेळी चाललेला गोंधळ पाहून त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत शिंदे यांना रोखले. यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी "आप बाहर निकल जाओ" असे हिंदीत म्हटल्यावर शिंदे यांनी या वाक्याला आक्षेप घेत "तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला!" अशी मागणी केली. पुढे वाद वाढत जाऊन, "मी तुला बाहेर पाठवीन" अशी धमकी वजा इशारा राम यांनी दिला. यावर शिंदे यांनी "मी घरात घुसून मारेन" अशी धमकी दिल्याचा आरोप आयुक्त राम यांनी केला आहे.

शिंदेंचा आरोप, आयुक्तांचा प्रतिउत्तर

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना किशोर शिंदे म्हणाले, "मी माजी नगरसेवक आहे, हे मी त्यांना सांगितले तरी देखील महापालिका आयुक्त उद्धटपणे वागले. त्यांनी मला धमकी दिली. हवे तर महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासावे.", अशीही मागणी शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे, आयुक्त नवल किशोर राम यांनी शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, "महाराष्ट्रात मी अनेक वर्षे काम केलं आहे. मात्र बैठकीदरम्यान अशाप्रकारे कुणीही जबरदस्तीने घुसलेले कधी मी पाहिलेलं नव्हते. त्यामुळे शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटतं नाही. ते सरळ सरळ गुंडागर्दीवर उतरले होते. मी त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले असल्याचं नवल किशोर राम यांनी सांगितलं.

या घटनेमुळे महापालिकेच्या राजकारणात नव्याने वादाची ठिणगी पडली असल्यास बोलले जात आहे. वादात भाषा आणि प्रांतीय ओळख या मुद्द्यांचा समावेश झाल्यामुळे प्रकरण आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

FAQs :

प्रश्न 1: पुणे महापालिकेत नेमका काय प्रकार घडला?
उत्तर: मनसेचे काही पदाधिकारी चालू बैठकीत घुसले आणि आयुक्तांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली.

प्रश्न 2: हा वाद का निर्माण झाला?
उत्तर: मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे वाद निर्माण झाला.

प्रश्न 3: या घटनेचे पुढील परिणाम काय असू शकतात?
उत्तर: या घटनेला मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग मिळू शकतो आणि राज्यातील वातावरण तापू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT