Solapur, 02 December : ‘ईव्हीएम’वर आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी प्रशासनकडे मागितली होती. प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने 02 डिसेंबर ते 05 डिसेंबर दरम्यान गावात जमावबंदीचा आदेश लागू केला असून गावातील 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. मात्र ‘आमच्यावर लाठीचार्ज झाला, गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहोत,’ अशी आक्रमक भूमिका मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, मारकडवाडी (Markadwadi ) गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर गावकरीही मतदान घेण्यावर आडून बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो, याची उत्सुकता आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना मिळालेल्या मतांवर मारकडवाडी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. आमच्या गावातून आमदार उत्तम जानकर यांना जादा मतदान झाले आहे, अशी भूमिका घेऊन मारकवाडी ग्रामस्थाने जिल्हा प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. त्याचा संपूर्ण खर्च करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दाखवली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने ती मागणी फेटाळली आहे.
जिल्हा प्रशासनाने मागणी फेटाळली असली तरी मारकवाडी ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मारकवाडीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) गटाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.
गावात एकूण 2476 मतदान असून, विधानसभा निवडणुकीत 1905 मतदान झालं आहे. त्यात राम सातपुते यांना 1003, तर उत्तम जानकर यांना 843 मतदान झाले आहे. आमच्या गावात 165 मतांचा फरक झाला आहे. सातपुते यांना मताधिक्य गेल्याने आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतपर्यंत जानकर आणि मोहिते पाटील यांना गावाने मताधिक्य दिले आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत मारकडवाडी ग्रामस्थ म्हणाले, काहीही झालं तर आम्ही उद्या (ता. 03 डिसेंबर) बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहोत. लाठीचार्ज झाला, डोकी फुटली, रक्तबंबाळ झालं. गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही प्रशासनाच्या पुढे झुकणार नाही. कोणालाही त्रास न देता आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहोत
अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठीचार्ज झाला, आम्हाला गोळ्या घातल्या, प्रशासनाला काहीही करू द्या. आमचा जीव जरी गेला तरी आमच्या मतांची खात्री झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. काहीही झालं तरी उद्या आम्ही मतदान घेणारच आहोत. सकाळी आठपासून आम्ही मतदानाची प्रक्रिया राबविणार आहेत. या प्रक्रियेला आमदार उत्तम जानकर यांचा पाठिंबा आहे. गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मतदान घेण्यावर ठाम आहोत. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
...तर संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल : उत्तम जानकर
याबाबत आमदार उत्तम जानकर म्हणाले, मारकडवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेणार असतील तर प्रशासनाला काय आक्षेप आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांवर लाठीचार्ज करण्यात आला तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ही निव्वळ स्टंटबाजी : राम सातपुते
मारकरवाडी गावकऱ्यांची पुन्हा मतदान घेण्याची मागणी ही निव्वळ स्टंटबाजी आहे, असे माजी आमदार राम सातपुते यांनी माळीनगर येथील माळीनगर फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.