Shambhuraj Desai,Sanjay Raut
Shambhuraj Desai,Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News: राऊतांनी वाचाळ बडबड बंद करावी... शंभूराज देसाई

सरकारनामा ब्युरो

सातारा : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ४० दिवस कारावास भोगला होता. या प्रश्नाबाबत राऊत चार दिवस तरी जेलमध्ये गेले होते का. राज्यातील वातावरण चिघळण्याचे काम खासदार राऊत करत असून त्यांनी आपली वाचाळ बडबड बंद करावी. ते आत होते त्यावेळी साडे तीन महिने महाराष्ट्र शांत होता. पुन्हा राज्यातील वातावरण बिघडेल व कुणाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये त्यांनी करु नयेत. न्यायालयाने त्यांना अद्याप 'क्लिन चिट' दिलेली नाही, हे लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

मंत्री देसाई यांनी आज त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणालेत की मला कर्नाटकात जावे लागेल, यावर शंभूराज देसाई म्हणाले, शरद पवारांनी बेळगावात जावे अशी आमच्या सरकारची भूमिका कधीच नाही. परवा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी राज्यांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. मी स्वत: तेथील पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे.आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर त्यांनी कारवाई केली आहे.

आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निर्दशनास ही गोष्ट आणून दिली आहे. दोन्ही राज्यात शांतता राहिल अशीच भूमिका असेल. आमच्या गटाच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. यामध्ये निवेदन तयार करुन पंतप्रधान मोदी व अमित शहांना देणार आहेत. तुम्ही बेळगावला कधी जाणार या प्रश्नावर ते म्हणाले, तेथे जायचे हे नक्की आहे. पण कधी जाणार हे सांगायचे नसते, असे सांगून या प्रश्नाला बगल दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वेगळे वळण घेत आहे. पण केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून समन्वयातून दोन्ही राज्यांची बैठक घेऊन तोडगा काढावा अशी राज्य सरकारची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे दोन दिवसांपासून राज्यातील शांततेची परिस्थितीला विचलीत करण्याचे, बिघडविण्याचे काम करत आहेत. राऊत साडे तीन महिने आराम करुन बाहेर आले आहेत. आराम करुन बाहेर आल्यावर अशापध्दतीने काही तरी वक्तव्ये करुन मी राज्यात ठाकरे गटात किती सक्रिय आहे हे दाखविण्याचा प्रयत्न चालू आहे.

आम्ही बेळगावला गेलो नाही म्हणून आम्ही षंड आहोत, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले, त्यांना माझा एकच प्रश्न आहे, कर्नाटक न्यायालयाचे तुम्हाला समन्स आले. त्यावेळी तुम्ही कर्नाटकात जाण्याचे धाडस का दाखवले नाही. मी बेळगावला गेलो तर अटक होईल, माझ्यावर हल्ला होईल, मला आत ठेवले जाईल, अशी स्वत:वरील हल्ल्याची भिती त्यांना आहे. मग दुसऱ्याला कोणत्या आधारावर षंड म्हणता, असा प्रश्न केला.

संजय राऊतांना कोणत्या आंदोलनात, कोणत्या सामाजिक प्रश्नावर जेल झाली नाही. तर पत्रचाळीत घोटाळ्याप्रकरणी त्यांना जेल झाली आहे. लाखो कोट्यवधीचा घोटाळा तपास यंत्रणांना आढळला आहे. आता बाहेर आल्यावर निर्दोष सुटल्यासारखे छाती बडवून बोलत आहेत. संपूर्ण सीमाप्रश्नात एकनाथ शिंदे यांनी काय केलं, या प्रश्नाला उत्तर देताना देसाई म्हणाले, छगन भुजबळ हे एक तुकडी घेऊन बेळगावला गेले, त्यानंतर दुसरी तुकडी घेऊन एकनाथ शिंदे बेळगावला गेले होते. त्यांना ४० दिवस जेल झाली तसेच पोलिसांनी त्रासही दिला होता. राऊतांना चार दिवस तरी जेल झाली होती का हे दाखवावे.

गुजरातचा निकाल देशाला दिशा देणारा....

गुजरातच्या निकालावर भाष्य करताना शंभूराज देसाई म्हणाले, गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवले आहे. हा निकाल देशाला दिशा देणार आहे. पंतप्रधान मोदींचे व्हिजन व विचारांवर जनतेने या निकालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलेले आहे. आता आगामी २०२४ मध्येही विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाचा विजय होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT