Prashant Paricharak-Babanrao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Babanrao Shinde : बबनदादांनी सुरू केली मुलाच्या विजयाची गोळाबेरीज; पंढरपुरात घेतली भाजपच्या माजी आमदारांची भेट

Assembly Election 2024 : माजी आमदार प्रशांत परिचारक यांंची आमदार बबनराव शिंदे यांनी भेट घेतली आहे. त्यामागे माढा मतदारसंघात जोडलेल्या 41 गावांचे गणित आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 05 November : राजकीय अस्तित्व पणाला लागलेले आमदार बबनराव शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधून मुलगा रणजितसिंह शिंदेंच्या विजयाची बेरीज सुरू केली आहे. त्यातून त्यांनी आज (ता. 05 नोव्हेंबर) भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपुरात येऊन भेट घेतली आहे. पंढरपुरातील 41 गावे माढ्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात, त्यामुळे परिचारक यांच्याकडून मदत मिळावी, यासाठी आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी माघार घेतली असून त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, तर महायुतीकडून माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे माढ्यात तुल्यबळ तिरंगी लढत होत आहे.

मुळात आमदार बबनराव शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांकडे उमेदवारीसाठी अनेकदा भेटून पाठपुरावाही केला होता. मात्र, पवारांनी शेवटपर्यंत बबनराव शिंदे यांना उमेदवारी शब्द दिला नाही. शेवटी अभिजीत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अभिजीत पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत जनमत महायुतीच्या विरोधात गेलेले आहे, त्यामुळे धास्ती घेतलेल्या बबनराव शिंदेंनी मुलाला जिंकून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच त्यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत साथ सोडलेल्या शिवाजी कांबळे यांना आपल्या गोटात आणले आहे. तत्पूर्वी भाऊ रमेश शिंदे यांच्याशी असलेला वादही मिटवून घेतला आहे. त्यामुळे मुलाच्या विजयासाठी बबनदादा शक्य तिथे गणित जुळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक यांंची आमदार बबनराव शिंदे यांनी भेट घेतली आहे. त्यामागे माढा मतदारसंघात जोडलेल्या 41 गावांचे गणित आहे. पंढरपूर तालुक्यातील 41 गावांचे राजकीय गणित जुळविण्याचा प्रयत्न बबनराव शिंदे करताना दिसत आहेत. अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील असून स्थानिक या नात्याने त्यांच्या बाजूने हा भाग न जाता आपल्यालाही मदत मिळावी, असे प्रयत्न बबनदादांकडून होत आहेत. त्याच दृष्टीकोनातून आज आमदार शिंदे यांनी पंढरपूर बाजार समितीच्या कार्यालयात माजी आमदार प्रशांत परिचारकांची भेट घेतली आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार बबन शिंदे यांच्यात पंढरपुरात झालेल्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली, याचा तपशील कळू शकला नाही. मात्र, पंढरपुरातून मदत व्हावी, यासाठीच त्यांनी परिचारकांची भेट घेतल्याचे मानले जात आहे. मात्र, परिचारक महायुतीच्या विरोधात भूमिका घेणार का, याकडे माढ्याचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT