Solapur, 06 November : ‘मधुरिमाराजे या कुणी साध्यासुध्या नसून छत्रपतींच्या सूनबाई आहेत. छत्रपतींच्या सुनबाईंसोबत कशाप्रकारे वागण्यात आले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ‘गादीचा मान’ असं म्हणत प्रचार केला. त्याच छत्रपतींच्या परिवारातील सूनबाईंना ‘दम नव्हता; तर उभारायचं कशाला’ अशी भाषा वापरण्यात आली. ते योग्य नाही. बंटी पाटील, तुमच्या सोबत कोणी काय केलं, तुमची घंटी कोणी वाजवली, ते बंटीभाऊंनी शोधावं,’ अशा शब्दांत भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी सतेज पाटील यांचा समाचार घेतला.
सोलापूर दक्षिणमधील भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी मधुरिमाराजे यांच्याबद्दल घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.
चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावताना मधुरिमाराजे यांना कशा प्रकारची वागणूक देण्यात आली. त्यांचे पती मालोजीराजे यांनी मधुरिमाराजे यांचा हात खेचून त्यांना पुढे घेतलं. त्यांचे सासरे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ‘यांच्यासमोर सही करा,’ अशा दरडावणीच्या भाषेत सांगितले. ते सगळ्यांनी ऐकलं आहे.
अर्ज मागे घेताना जी अगतिकता मधुरिमाराजे (Madhurimaraje) यांच्यावर चेहऱ्यावर होती, ती डोळ्यांत पाणी आणणारी होती. ज्या पद्धतीने त्यांना वागण्यात आलं, त्यामुळे मला एक बाई म्हणून अत्यंत दुःख झालं. मधुरिमाराजे यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता बघवत नव्हती. त्या कुठल्या मनःस्थितीत असतील, त्यांना आणि परमेश्वरालाच माहिती. परमेश्वराने त्यांना बळ द्यावं, अशी मी प्रार्थना करते, असेही वाघ यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीबाबतही चित्रा वाघ यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, मला माहिती नाही. पण मागे एकदा साहेब म्हणाले होते मला आठवतं की, मी आता लढणार नाही. पण, पुढे ते निवडणुका लढले होते, त्यामुळे आता ते काय बोललेत हे मला माहित नाही.
हिना गावित यांनी भाजपचा राजीनामा दिला असून त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, तीनही पक्षांमधील जागा वाटपामुळे आमचे बरेच कार्यकर्ते नाराज झाले आहे. हीना गावीत ही आमची एक चांगली बहीण आहे. आमच्या सोबत त्यांनी पूर्वी काम केले आहे. आताही करत आहे. त्याच्यामुळे त्यांचा असा निर्णय झाला आहे, हे मला माहित नव्हतं. पण, आता काय बोलणार, प्रत्येकाला लढायची इच्छा असते. लोकशाहीत प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी काहीतरी ठरवलं असेल.
महाविकास आघाडी नेत्यांचे वक्तव्याबद्दलही आमदार वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. महाभकास आघाडीच्या नेत्यांकडून अतिशय संतापजनक असे वक्तव्य केले जात आहे. मातृशक्तीचा किती अपमान करता येईल, त्या पद्धतीने अपमान करण्याची स्पर्धा लागली.
शायना एनसी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांना म्हणाले की ‘बकरी आहे आणि माझ्या गळ्यात बांधली आहे. वीस तारखेला तिला कापू’ अरे ही कुठली भाषा. मला आश्चर्य या गोष्टीचा वाटतं, बोलणाऱ्या सगळ्या गप्प आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानजनक बोललं गेलं. देवेंद्र फडणवीसांनी बोलणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक केली. शायना एनसी, सुवर्णा करंजे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने बोललं गेलं. त्याच्यावर शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा सांगणारे, महिलांचे सक्षमीकरण, सशक्तिकरण्यावर घसा कोरडा होईपर्यंत बोलणारे. बारामतीच्या मोठ्या ताईंपासून अगदी खालच्या सटरफटरपर्यंत कोणीही बोलायला तयार नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे.
महिलांबद्दल त्यांच्या मनात किती विषय हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आहे. याच मातृ शक्तीची सणसणीत थप्पड ही महाविकास आघाडीला बसल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.