Dhairyasheel Mohite Patil-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore on Mohite Patil : खासदारसाहेब, लुंग्या-सुंग्यांच्या नादी लागून प्रसिद्धीचा स्टंट करू नका; गोरेंचा मोहिते पाटलांना टोला

विशाल गुंजवटे

Maan, 24 July : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी माण-खटावसाठी चार दिवसांपूर्वीच सोडण्यात आले आहे. जलसंपदा मंत्र्यांकडे त्याची मागणी आम्ही गेल्याच महिन्यात केली होती.

आता नेर धरणात पाणी पोहोचत आहे. खासदारसाहेब, तुम्ही थोडे झोपेतून जागे व्हा. प्रसिद्धीसाठी वराती मागून घोडे दामटायचे बंद करा, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना लगावला.

उरमोडी किंवा जिहे-कठापूरचे पाणी खटाव आणि माण तालुक्यांसाठी सोडण्याची मागणी केल्याचा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी केला होता. त्यावरून आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी खासदार मोहित पाटील यांच्यावर टीका केली होती.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुरेसा पाऊस सुरु असल्याने दुष्काळी खटाव आणि माण तालुक्यांसाठी जिहे-कठापूर योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी पत्राद्वारे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश त्वरित दिले होते.

त्या आदेशाची अंमलबजावणी होवून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने चार दिवसांपूर्वीच सोडण्यात आले आहे. या योजनेचे पाणी वर्धनगड येथील दाब हरण कुंडापर्यंत पोहचून नेर धरणाकडे झेपावले आहे. थोड्या कालावधीसाठी तांत्रिक अडचण आली होती. मात्र, त्यावरही मात करण्यात आली आहे, असेही गोरे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांच्या पाणी प्रश्नावरील माझी लढाई गेली १५ वर्षे सुरु आहे. अत्यंत प्रयत्नपूर्वक मी ही लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. गेली १२ वर्षे उरमोडीचे पाणी गरज असेल तेव्हा मतदारसंघात येत आहे.

पाणीवाटपात कधीही दुजाभाव न करता, प्रसंगी नियम डावलून ‘हेड’ कडून ‘टेल’कडे पाणी नेण्यात आले आहे. ज्यांना पाण्याविषयी तळमळ नाही, ज्यांची कुवत नाही, ज्यांना कोण विचारत नाही आणि ज्यांचे मत कुणी विचारत घेत नाही, असे महाभाग हा प्रश्न तेल घालून पेटवायचा नेहमीच प्रयत्न करतात.

आताही जिहे-कठापूर योजनेचे पाणी सोडण्यात आल्यावर लुंग्या सुंग्यांच्या सांगण्यावरुन खासदार मोहिते पाटील यांनी वरातीमागून घोडे दामटले आहेत. येरळवाडी तलाव क्षेत्र वनसंवर्धन राखीवमधून वगळण्यासाठी मी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राकडे तशी शिफारस करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याच लुंग्या सुंग्यांनी खासदारांना झोपेतून जागे केले. त्यांनी अशा महाभागांच्या नादी लागून प्रसिद्धीचा स्टंट करू नये, असा सल्लाही आमदार गोरेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT