Dhairyasheel Mohite Patil - Ram Satpute  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल; म्हणाले ‘काही पराभूत लोक विकासकामांत लुडबूड...’

Ram Satpute News : आम्ही महाविकास आघाडीत म्हणजे विरोधात असलो तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या पातळीवर विकास कामांच्या संदर्भात अजून तरी काही अडचणी आलेल्या नाहीत. आगामी काळातही त्या येतील, असे आम्हाला वाटत नाही.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 16 January : माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला कलगीतुरा थांबयाचे नाव घेताना दिसत नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीडचे पार्सल असा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीत सातपुतेंना पराभूत करण्याचे आवाहन केले होते. लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही पराभूत झालेल्या सातपुतेंनी मोहिते पाटलांवर हल्लाबोल सुरू केला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्याबाबतची तक्रार करताना ‘काही पराभूत लोक विकास कामांत लुडबूड करत आहेत,’ असे म्हटले होते.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ), आमदार अभिजीत पाटील, समाधान आवताडे, राजू खरे, पुनर्वसन अधिकारी मोनिका ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे आदींच्या उपस्थितीत पंढरपूर तालुक्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी संदर्भात पुनर्वसन अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार मोहिते पाटील यांनी माजी आमदार सातपुते यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आम्ही महाविकास आघाडीत म्हणजे विरोधात असलो तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या पातळीवर विकास कामांच्या संदर्भात अजून तरी काही अडचणी आलेल्या नाहीत. आगामी काळातही त्या येतील, असे आम्हाला वाटत नाही. पण, पराभूत झालेले काही लोक विकास कामांमध्ये लुडबूड करीत आहेत, अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाव न घेता माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर केली.

मोहिते पाटील म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी लोकांच्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावा करू. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. मात्र, काही पराभूत झालेले लोक विकासकामांमध्ये लुडबूड करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.

आजच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यावर येत्या दोन ते तीन महिन्यांत कार्यवाही करण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच, सांगोला ते दानापूर अशी किसान रेल्वे सुरू करण्याची आमची मागणी आहे. सातारा, मिरज, मुंबई अशी दररोज रेल्वे सुरु करावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईसाठी लवकरच दररोज गाडी सुरु होईल. तसेच पंढरपूर-देहू अशी नवीन गाडी सुरु करण्याची मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. त्या दृष्टीने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चाचपणी सुरु केली आहे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता चिंताग्रस्त आहे. मुख्यमंंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणारत तातडीने लक्ष घालावे. पोलिसांना कारवाईसाठी मोकळीक देऊन गुंडगिरी मोडून काढावी, अशीही मागणी मोहिते पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT