Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये...शिवेंद्रराजे

Shivendraraje Bhosale उदयनराजेंनी केलेल्या टीकेला आज शिवेंद्रसिंहराजेंनी सडेतोड उत्तर दिले.

Umesh Bambare-Patil

Satara News : अजिंक्य उद्योग समुहावर टीका करून नेहमीचे तुणतुणे वाजवणे खासदार उदयनराजेंनी बंद करावे. अजिंक्यतारा उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल ३६० कोटींची असून या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे. उदयनराजेंनी अशी एखादी संस्था उभी करुन कोणाच्या संसाराला हातभार लावला याचे उत्तर द्यावे. छत्रपतींचा वारसा सांगून टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आगामी निवडणुकीत सातारा नगरपालिका त्यांच्या भ्रष्टचारातून मुक्त करणार, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना दिला आहे.

उदयनराजेंनी केलेल्या टीकेला आज शिवेंद्रसिंहराजेंनी सडेतोड उत्तर दिले. त्यांच्या सुरुची निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजे हे सातत्याने अजिंक्य उद्योग समूहावर टीका करत आहेत. मात्र, अजिंक्य उद्योग समूह हा साडेतीनशे कोटीचा नेटवर्थ असलेला कारखाना आहे. शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसाच्या दिली जातात.

सूतगिरणीत दोनशे कामगार असून तीन कोटी पगार आणि बोनसला वीस लाख रुपये दिले जातात. सातारा तालुक्याच्या अर्थकारणामध्ये अजिंक्य उद्योग समूहाचे मोठा हातभार आहे.आपण काहीच केलेले नाही, त्यामुळे अजिंक्य उद्योग समूहाच्या भ्रष्टाचाराचे नेहमीचे तुंणतुणे वाजवत असून ते त्यांनी बंद करावेत. उदयनराजेंनी अशी एखादी संस्था उभी करुन कोणाच्या संसाराला हातभार लावला याचे उत्तर द्यावे.

सातारा शहरासाठी डीपीडीसी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हद्दवाढ भागात कामांचा पाठपुरावा आणि त्याला निधीची उपलब्धता मी सातत्याने केली आहे. उदयनराजेंच्या एकाही विकास कामाचे श्रेय घेण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. मात्र, सातारा पालिका त्यांच्या सातारा विकास आघाडीने धुवून खाल्ली. गेल्या पाच वर्षात त्यांना एकही मोठा प्रोजेक्ट पूर्ण करता आलेला नाही. मिश्या काढीन भुवया काढीन असले डायलॉग मारण्यापलीकडे काही काम त्यांना उरलेले नाही.

ते नेहमीच समोरासमोर या आणि होऊन जाऊ द्या असं म्हणतात. पण समोरासमोर येऊन करायचे काय तुमचा पाच वर्षाचा भ्रष्टाचार कारभाराचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच तुम्ही भावनिक राजकारण करत आहात. ते दिवस आता संपलेले आहेत सातारा पालिका भ्रष्टमुक्त करण्यासाठी आम्ही तयारी केली असून लवकरच उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला सातारकर नारळ देतील.

जिल्हा बँक निवडणुकीत आपली राजकीय ताकद नव्हती, तेव्हा आपण माझ्याच केबिनमध्ये येऊन बसला होतात. अजिंक्यतारा बँकेच्या ठेवी सुरक्षितपणे मर्ज झालेल्या बँकेत हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. कोणत्याही ठेवीला धक्का लागला नाही. एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झालेला नाही. हे आधी उदयनराजे यांनी समजून घ्यावे आणि मग डायलॉग बाजी करावी. समजत नसेल तर एखादा शहाणा स्वीय सहाय्यक ठेवून त्याच्याकडून समजून घ्यावे.

टोलनाके चालवणारे राजघराण्यात कसे काय जन्माला आले, असा प्रश्न करुन टोलनाक्यावर मारामारी, दादागिरी, वसुली असले प्रकार कोणाच्या सांगण्यावरून घडतात हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्हाला शिकवू नये. ही त्या आगामी काळात पालिका आम्ही भ्रष्टचारामुक्त करणार असून आपल्या भावनिक राजकारणाचे दिवस आता संपलेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT