Narayan Patil-Sanjay Shinde-Digvijay Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Adinath Sugar Factory : करमाळ्यात पुन्हा रंगणार मिनी विधानसभेची रणधुमाळी; नारायण पाटील, संजय शिंदे, बागल ‘आदिनाथ’साठी येणार आमने सामने

Karmala Political News : करमाळ्याची आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेनंतर तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 08 March : करमाळ्याची आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेनंतर तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकणार आहेत. मात्र, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला आदिनाथ काखाना चालविण्याचे मोठे आव्हान निवडून येणाऱ्या सत्ताधाऱ्यांपुढे असणार आहे, हे मात्र निश्चित.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे (Adinath Sugar Factory) २१ संचालक निवडण्यासाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून १९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी दहा मार्चपासून म्हणजे सोमवारपासून १७ मार्चपर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दाखल अर्जाची १८ मार्च रोजी छाननी होणार असून १९ मार्च रोजी पात्र उमेदवारी अर्जांची यादी जाहीर होईल. ता. १९ मार्च ते ०२ एप्रिलपर्यत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर ता. ३ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हवाटप केले जाणार आहे.

करमाळा (Karmala) तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्तीच्या अगोदर तीन टर्म बागल गटाची सत्ता होती. मात्र, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रेाला भाडेत्तत्वावर चालवायला देण्याचा निर्णयही बागल गटाने घेतला होता. मात्र, हस्तांतर प्रक्रियेमध्ये दोन वर्षे गेली. मधल्या काळात राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले आणि बारामती ॲग्रोला आदिनाथ देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.

दरम्यान, तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या पुढाकाराने आदिनाथ कारखाना आमदार नारायण पाटील (Narayan Patil) आणि बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी एकत्र येऊन चालवावा, यासाठी प्रयत्न केले. पाटील आणि बागल यांना एकत्र आणत दोघांची एकत्रित बैठकही घेण्यात आली. मात्र, पुढे काहीही निष्पन्न झाले नाही. काही दिवसानंतर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे आमने सामने आले होते. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांत विधानसभेप्रमाणे करमाळ्यात आदिनाथची निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे. हे तीनही गट आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.

आदिनाथ काखान्याच्या निवडणुकीत बागल गटही संपूर्ण ताकदीनिशी उतरू शकतो. मात्र, त्यांच्याकडे सत्ता असतानच कारखान्यावर प्रशासक आलेला आहे. तसेच, मकाई कारखानाही अडचणीत आहे. बागलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून मदत झाली आणि त्यानंतर कारखाना सुरू झाला. मात्र, आदिनाथच्या निवडणुकीत बागल गटाची कसोटी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची तयारी चालवली आहे. मात्र संजयमामा शिंदे यांनी त्याबाबत अजून कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे शिंदे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

विद्यमान आमदार नारायण पाटील यांचे आदिनाथ कारखान्याशी भावनिक नाते आहे. नारायण पाटील यांचे पिताश्री गोविंदबापू पाटील यांनी हा कारखाना उभारण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. आदिनाथ कारखाना उभा करेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. कारखान्याचा पहिला गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर त्यांनी पायात चप्पल घातली होती.

याबाबत आमदार नारायण पाटील म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहे. हा कारखान्या आमच्या वडिलांना उभारला आहे. सरकारची मदत घेऊन हा कारखाना उत्तमरित्या चालवून दाखवू.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली सरकारी मदतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे पाठपुरावा करून मदत मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी शेतकरीहितासाठी आम्ही सरकारच्या दरबारात जाऊ आणि मदत मिळविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

कोणत्या मतदारसंघातून किती संचालक येणार?

जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम, रावगाव अशा पाच ऊस उत्पादक सभासद गटांतून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण १५ प्रतिनिधी तर ऊस उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी - १, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिनिधी (१), महिला राखीव प्रतिनिधी (२), इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी (१) व भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग (१) अशा एकुण ६ मतदार संघांतून एकूण २१ प्रतिनिधी या प्रक्रियेद्वारे निवडण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT