Nashik MLC: राज्यातील तीन मंत्री नाशिक विधानपरिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची मनधरणी करत आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्याचे खरे कारण आज अपक्ष उमेदवार गीते यांनीच स्पष्ट केले आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना अपक्ष गोकुळ गीते यांचा पाठिंबा हवा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह तीन मंत्री सतत पाठपुरावा करीत आहे. मात्र याबाबत खुद्द उमेदवार दराडे यांनी कोणतीही वाच्यता केलेली नाही.
नरेंद्र दराडे यांनी मौन धारण केल्याचे खरे कारण गोकुळ गीते यांनी आज उघड केले. या संदर्भात गीते यांनी नरेंद्र दराडे यांची अक्षरश: राजकीय चिरफाड केली. दराडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप त्यांनी केले. अपक्ष उमेदवार गीते म्हणाले, नरेंद्र दराडे यांच्या विषयी मतदारांमध्ये नाराजी आहे, असे मला वाटत होते. प्रत्यक्ष मी जेव्हा मतदारांपर्यंत पोहोचलो तेव्हा दराडे यांच्या विषयी अक्षरशः संतापाचे वातावरण आहे. दराडे यांना मतदार दारात देखील उभे करणार नाही अशी स्थिती आहे.
आमदार दराडे गेली सहा वर्ष आमदार होते. त्यानंतर दोन वर्ष निवडणूक न झाल्याने ते आमदारासारखेच होते. या आठ वर्षात त्यांनी काय काम केले? कोणासाठी आपली आमदारकी उपयोगात आणली? हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. आमदार निधीचा काय उपयोग झाला ही अतिशय धक्कादायक बाब आहे. कोणत्याही नगरसेवकाला पाच लाख की एक लाखाचा विकास निधी त्यांनी दिला असेल तर जाहीर करावे. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही त्यामुळे ते बोलू शकत नाही, असा गौप्यस्फोट गीते यांनी केला.
आमदार किशोर दराडे सदिच्छा भेट म्हणून आपल्या घरी येऊन गेले असे सांगतात. प्रत्यक्षात ते माझे बंधू गणेश गीते आणि मला भेटण्यासाठी आले होते. मी त्यांची भेट नाकारली. कारण त्यांच्याशी चर्चा करावी अशी काहीच गोष्ट नाही, असे सांगून गीते यांनी आमदार किशोर दराडे यांनाही उघडे पाडले.
दराडे यांनी माझ्या घरी येऊन दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली. ते म्हणाले की, कुणाल दराडे चुकला. ते आम्हाला भावासारखे मानतात. मग कुणाल दराडे यांनी माझा बाप काढला म्हणजेच त्यांचाही बाप काढला. एवढेच नव्हे तर कुणाल दराडे यांचे यापेक्षाही खालच्या दर्जाची भाषा असलेले असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. एका कर्मचाऱ्याच्या सात पिढ्यांचा उद्धार कुणाल दराडे यांनी केलेला आहे.
तीन मंत्री सातत्याने मला दराडे यांना पाठिंबा देण्याची विनंती करतात. याचे खरे कारण दराडे यांचा पराभव होणार आहे याची जाणीव या मंत्र्यांना झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला उमेदवार चुकला याची कल्पना आहे. मात्र आता वेळ निघून गेली आहे. त्यामुळे ते काहीच करू शकत नाही, असा गौप्यस्फोट करून गिते यांनी विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.