makarand patil-jaykumar gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli-Satara MLC : सांगली-सातारा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचा निर्णय झाला; भाजपच्या बड्या मंत्र्याने मकरंदआबांचं नाव घेत केला मोठा दावा

Jaykumar Gore's Major Claim : धैर्यशील कदम यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानासाठी व्हीप काढल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला. त्यामुळे सातारा-सांगलीतील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 16 June : सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीबाबत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कदम यांना मतदान करण्याबाबतचा व्हीपही राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आल्याचा दावा गोरे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तसा निर्णय जाहीर केलेला असेल तर सांगली-सातारामधील निवडणूक एकतर्फी होऊ शकते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गोरे यांनी सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.

गोरे म्हणाले, सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी तसं जाहीरही केलं आहे. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्याबाबतचा व्हीपही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बजावण्यात आला आहे, असा दावाही पालकमंत्री गोरे यांनी केला आहे.

शिवसेनेचा निर्णय आज किंवा उद्यापर्यंत होणे अपेक्षित आहे, तोही निर्णय होईल, त्यामुळे महायुती मजबूत आहे. अजिबात चिंता करू नका, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

जयकुमार गोरे म्हणाले, भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था करायची आहे, ती सोलापूर आणि सांगली सातारा या दोन्ही मतदारसंघात करण्यात आलेली आहे. सांगली सातारामधून धैर्यशील कदम आणि सोलापूरमधून राजेंद्र राऊत हे मोठ्या फरकाने जिंकून येतील, याबाबत चिंता करण्याची गरज नाही.

शिवसेना आणि आम्ही सोबत आहोत. शिवसेना आमच्यासोबत आली नाही हा जर तरचा विषय आहे. आम्ही सोबत आहोत. निवडणुकीत जिंकण्यासाठीच उमेदवार उभा केला जातो, आमच्या पक्षाने थोडीच पडण्यासाठी उमेदवार उभा केला आहे, तो जिंकण्यासाठीच उभा केलेला आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

शंभूराज देसाई नाराज नाहीत

साताऱ्यात निधी देण्याचा अधिकार हा शंभूराज देसाई यांनाच आहे. त्यामुळे ते निधीवरून बिलकुल नाराज नाहीत. आम्ही महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आणखी छोटे छोटे पक्षही आमच्या सोबत राहतील, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

राजकीय शाळेतील अभ्यास कधीही संपत नाही

विधान परिषद निवडणुकीच्या गृहपाठाबाबत ग्रामविकास मंत्री म्हणाले, मिरीटचा विद्यार्थी कधीही पुस्तकं बाजूला ठेवत नाही. मिरीटचा विद्यार्थी हा नेहमी पुस्तकं घेऊनच अभ्यास करत असतो. या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही, मग ती राजकीय शाळा असो किंवा आणखी कोणती ही असो..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT