Mahesh Shinde, Ajit Pawar
Mahesh Shinde, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीने घोटाळे करायचे...पापाचे धनी शिवसेना होत होती....

राजेंद्र शिंदे

खटाव : 'ॲक्शनला-रिॲक्शन' हा सायन्सचा नियम आहे. मुख्यमंत्री आजारी असताना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आमच्यावरच षडयंत्र करण्यात मग्न होता. राष्ट्रवादीने दररोज नवनवीन घोटाळे करायचे व पापाचे धनी शिवसेना होत होती. एकेकाळी एक नंबर असलेला शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला. पक्षाची अधोगती सर्वच आमदारांना पाहवेना, म्हणून आमदारकी डावावर लावून आम्ही टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी दिली.

राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे खटाव या मूळगावी पहिल्यांदाच परतले. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ढोल-ताशांचा निनाद व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आमदार शिंदेंचे स्वागत केले.

महेश शिंदे म्हणाले, खटाव तालुक्याला संजीवनी ठरणारी लक्ष्मणराव इनामदार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या सहकार्याने पूर्णत्वाकडे आली. तिच्या पुढच्या कामाला गती देणे गरजेचे होते. परंतू, राष्ट्रवादीला हे काम पूर्ण करायचे नव्हते. महाराष्ट्रात कोणालाही निवडून आणू शकतो, कोणालाही पाडू शकतो, अशी भाषा करत अहोरात्र घटक पक्षातील आमदारांची जिरवायला सुरवात करू लागल्यानेच आम्हाला हा उठाव करावा लागला.

आमदार शिंदे म्हणाले, प्रत्येक कामात अडथळा करू लागले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मतदारसंघात येऊन पुढचा आमदार राष्ट्रवादीचा असेल, असे जाहीरपणे वक्तव्य करू लागले. त्यामुळे आम्हीही ठरवले, पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. ते नुसते ठरवले नाही, तर करूनही दाखवले. कोरोना काळात एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले.

भरभरून सहकार्य केले. मात्र, मित्रपक्ष कुचंबणा करत होता. हे सर्व अन्यायकारक व असह्य होते. मंडळाचा अध्यक्ष आजारी असल्याने खजिनदाराने हातात सूत्रे घेऊन संपूर्ण खजिन्यावर माझीच मालकी म्हणू लागल्याने त्यांची हकालपट्टी करणे अनिवार्य बनल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नामोल्लेख टाळत त्यांचा समाचार घेतला.

राष्ट्रवादीने दररोज नवनवीन घोटाळे करायचे व पापाचे धनी शिवसेना होत होती. एकेकाळी एक नंबरचा असलेला शिवसेना त्यांच्यामुळे चौथ्या क्रमांकावर फेकला. पक्षाची होत असलेली अधोगती सर्वच आमदारांना पाहवेना, म्हणून आमदारकी डावावर लावून आम्ही टोकाचा निर्णय घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरे नेहमीच वंदनीय असून त्यांच्याबद्दल नेहमीच आदर असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला गडचिरोली

अधिकाऱ्यांना अंगावर सोडत कार्यकर्त्यांना त्रास देण्यात राष्ट्रवादी मग्न होती. आता सत्ता आपली आलीय. येत्या एक वर्षात प्रत्येकाच्या शिवारात कॅनॅालने पाणी पोचवणे, ही महेश शिंदेंची जबाबदारी असणार आहे. खटावात पाच कोटी ७० लाखांची पाणी योजना मार्गी लागत आहे. नवीन कारखाने काढून रोजगारनिर्मिती केली जाणार आहे. जो कोणी अधिकारी त्रास देईल, त्याला गडचिरोली दाखवण्यात येईल, असा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT