बिजवडी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आपण सर्वजण दैवत मानतो. त्यांचेच पक्ष प्रमुख उद्धव हे पुत्र आहेत. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पेलत असताना व ते आजारी असताना आपल्याच लोकांनी त्यांच्याविरोधात अशा प्रकारचे बंड करणे अशोभनिय आहे. नाराजीसंदर्भात चर्चेतून मार्ग निघू शकतो, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सातारा जिल्ह्यातून दोन आमदार या बंडात सहभागी असले तरी जिल्ह्यातील शिवसैनिक उपनेते नितीन बानुगडे पाटील व जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे स्पष्ट मत शिवसेना युवानेते शेखर गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
शेखर गोरे म्हणाले, शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षाची ताकद वाढवली. शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कै.बाळासाहेबांची उणीव भासू दिली नाही. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राज्यातील जनतेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यात राज्यावर जीवघेणे कोरोनाचे संकट आले.
या काळात व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत उपाय योजना केल्या. कोरोना काळात महाराष्ट्राने देशात एक नंबरचे काम केल्याबद्दल आपल्या पक्षप्रमुखांचे नाव झाले होते. यादरम्यान स्वत: ते कोरोनाबाधित झाले. त्यांची ऑपरेशने झाली, तब्बेत ठिक नव्हती. या सर्व घटनातून जात असताना आपल्या लोकांना त्यांना वेळ देता आला नसेल. परंतू तरीही त्यांनी यातून वेळ काढत शिवसंपर्क संवाद अभियानातंर्गत प्रत्येक मतदारसंघातील अहवाल मागवत पक्षबांधणीचे काम सुरू केले होते.
अशा परिस्थितीत त्यांना साथ देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असताना मंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष प्रमुखाविरोधात बंड केले. सर्व आमदारांनी आपल्या मनातील खदखद एकदा साहेबांसमोर जावून बोलायला हवी होती. चर्चेतून निश्चितच मार्ग निघाला असता. त्यांची तब्बेत बरोबर नसताना असे बंड करून धक्का देणे बरोबर नव्हते.
सत्तेचा उपभोग घेताना राष्ट्रवादी पक्षाने स्वार्थ साधत सर्वांनाच त्रास देण्याचे धोरण राबवलंय हे खरे आहे. परंतु यावर असा निर्णय घेणे योग्य नव्हते. आम्हीही राष्ट्रवादीच्या त्रासाचा सामना केलाय. मी २०१९ ला विधानसभा निवडणूकीवेळी प्रवेश केल्यानंतर भाजप शिवसेनेची युती होती. माणची जागा भाजपला गेली असतानाही उद्धवजींनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता. प्रसंगी त्यांनी माण मतदारसंघापुरती युती तोडून दिलेला शब्द खरा ठरवून आपल्याला उमेदवारी दिली होती.
आदल्यादिवशीची सभा रद्द झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सभा घेऊन आपला शब्द पूर्ण करणारे नेते मी पहिल्यांदा पाहिलेत. निवडणूकीत अपयश आल्यानंतरही शेखरजी तुमचे कार्य मोठे आहे तुमच्याकडे मोठी जबाबदारी देणार आहोत, असे बोलून आपल्यावर विश्वास दाखवला होता. माझ्या सारख्या नवख्या कार्यकर्त्यावर दाखवलेला विश्वास आम्ही कदापि विसरू शकत नाही. या अडीच वर्षात शिवसेना व पक्षप्रमुख उद्धवजींच्या कार्याने प्रभावित झालोय.
त्यामुळे आम्ही शिवसेनेशी व उद्धवजींशी बांधील आहोत. किती ही मोठी संकटे आली तरी आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. तुम्ही सर्वजण तर वर्षानुवर्षे शिवसेनेशी जोडलेली लोक आहात. माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यावर जर ते एवढा विश्वास दाखवत ताकद देत असतील तर जुन्या व निष्ठावंत लोकांना त्यांनी किती ताकद दिली असेल हे सांगण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी आपल्याच लोकांच्या बंडानंतर वर्षा निवास सोडण्याचा निर्णय घेतला.
हे स्थान सोडताना शिवसैनिकांसह राज्यातील सर्वसामान्य जनता भावूक होत गहिवरून आली होती.यावरूनच उद्धवजींच्या कार्याची ओळख होते. शिवसेनेत आम्ही आताच आलोय पण या कालावधीत साहेबांनी आम्हालाच नेहमीच न्याय दिलाय. तुम्ही लोक तर पूर्वी पासून शिवसेनेशी जुळलेली आहात. राष्ट्रवादीविरोधातली नाराजी व उद्धवजींच्या बाबतचे गैरसमजाचा फटका आपल्या पक्षाला बसू नये यासाठी आपल्या निर्णयापासून माघारी फिरत आपल्या दैवताच्या पुत्राला साथ द्यावी, असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.