Nilesh Lanke News
Nilesh Lanke News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नीलेश लंके यांनी विरोधकांचे त्रिफळा उडविण्याचे रचले मनसुबे

मार्तंड बुचुडे

पारनेर ( जि. अहमदनगर ) - पारनेर नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. या सत्ताकारणात आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांची भूमिका महत्त्वाची होती. पारनेर नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या आमदार लंके यांनी पुढील नवीन लक्ष्य निश्चित केले असल्याचे जाहीर करत भाकीत केले आहे. ( Nilesh Lanka's plan to blow up the opposition's triphala )

पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय औटी यांची तर व उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची काल ( ता. 16 ) निवड झाली. या निवडीनंतर विजयी सभेत आमदार लंके बोलत होते. नीलेश लंके म्हणाले की, नगरपंचायतीच्या निमित्ताने विरोधकांची आता पहिली विकेट घेतली आहे. दुसरी विकेट बाजार समितीच्या निवडणुकीत घेणार आहे. तिसरा त्रिफळा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उडविणार आहे. विरोधकांनी निवडणुक काळात माझा बाहेरचा म्हणून अपप्रचार केला मात्र मतदारांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात नगरपंचायतीची सत्ता दिली असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

ते पुढे म्हणाले, नगरपंचायतीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसले तरी नगरपंचायत ताब्यात आली याचा मोठा आनंद झाला आहे. आमच्या ताब्यात सत्ता दिली. आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलल्या शिवाय राहणार नाही. आमच्या नगरसेवकांना विरोधकांनी अनेक अमिषे दाखवली मात्र कोणीच फुटले नाही. इतकेच नव्हे भारतीय जनता पक्षाचे अशोक चेडे यांनीही आम्हालाच पाठिंबा दिला.

मी बाहेरचा, बाहेरच्या माणसाच्या ताब्यात शहराची सत्ता द्यावयाची का असा अपप्रचार विरोधकांनी केला मात्र मी तालुक्याचा आमदार आहे. हेही विरोधक विसरले. आता पहिली विकेट घेतली आहे. या नंतरच्या सर्व निवडणुका जिंकून विरोधकांना हद्दपार केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राजकारणात काम करताना समाजकारण करता आले पाहिजे. आमचा नगराध्यक्ष झाला. आता आमची जबादारी वाढली आहे. नगरपंचायतीसाठी कार्यालय, शहरातील रस्ते, पाणी योजना, बाजारपेठ, क्रीडा संकुल आदी विकास कामे करावी लागणार आहेत. मी शहरवासीयांना तसा शब्द दिली आहे. तो मी पूर्ण करणार असेही आमदार लंके यांनी सांगितले.

या वेळी तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, रा.या. औटी, चंद्रकांत चेडे, विजय डोळ, अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, सादिक राजे, गंगाराम बेलकर, राजेंद्र चौधरी, सुदाम पवार, अशोक कटारिया, संजय वाघमारे यांचीही भाषणे झाली. अॅड. राहुल झावरे यांनी प्रास्तविक व आभार मानले.

जेसीबीमधून मिरवणूक

पारनेर नगर पंचायतमधील अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी नंतर विजयी सदस्यांची जेसीबीमधून मिरवणूक काढण्यात आली. जेसबीने गुलाल व भंडारा उधळला. आमदार लंके यांच्या सह नगराध्यक्ष औटी व उपनगराध्यक्ष भालेकर यांच्यासह नगरसेवकांचा सुमारे तीनशे किलो वजनाचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

आमदार लंके यांच्या आशीर्वादाने मला नगराध्यक्ष पद मिळाले आहे. आमदार लंके व जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे मी विकासाची कामे करणार आहे. शहराचा पाणीप्रश्नाला प्राधान्य देऊन प्रथम तो सोडविणार आहे.

- विजय औटी, नूतन नगराध्यक्ष, पारनेर.

महिलांसाठी पाणी प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे मला जनतेने दुसऱ्यांदा नगरसेवक पदाची संधी दिली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाबरोबरच महिलांसाठी नागरपंचायतीत अनेक उपक्रम राबविणार आहे.

- सुरेख भालेकर, नूतन उपनगराध्यक्ष, पारनेर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT