Nilwande Dam Dispute : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nilwande Dam Dispute : पाणीप्रश्नावर राजकीय आगडोंब उसळला; जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर...

Ahmednagar Politics On Nilwande Dam : गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात रोष वाढला होता.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नाशिकनंतर नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून जायकवाडीला काल रात्री दहा वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला या पाण्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नगर जिल्ह्यात पाणी सोडण्याच्या या निर्णयावर संताप सुरू झाला आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील राजकीय नेत्यांनी इशारा देऊनदेखील काहीही झाले नाही, दुष्काळी काळात उद्भवणार्‍या आक्रोशाला समोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा निळवंडे पाटपाणी कृती समितीने दिला आहे. (Latest Marathi News)

निळवंडे धरणातून काल रात्री दहा वाजल्यापासून 100 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढील किती दिवस सुरू ठेवायचे आहे, याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सूचना नसल्याचे जलसंपदाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील काही भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

मराठवाड्याला पाणी मिळत नसल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात रोष वाढला होता. पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी गोदावरी काठच्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याशिवाय पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातून कोणत्याही स्थितीत जायकवाडीला पाणी सोडू द्यायचे नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी घेतली होती. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात ठराव झाला होता. या ठरावाचे पडसाद राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. परंतु मराठवाड्यातील मंत्री आणि नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच काही संघटनांनी अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. परिणामी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

दादासाहेब पवारांचा इशारा -

"समन्यायी पाणीवाटप हा कायदा नगर आणि नाशिकमधील शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. दुष्काळाची तीव्रता एवढी आहे की, पुढे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. पिकांना, दुधाला भाव नाही. महागाई वाढली आहे. शेतकर्‍यांनी काय करावे. शेतकर्‍यांच्या हातात काहीच नाही. मालक असूनदेखील दुसर्‍यासमोर हात पसरावे लागतात. आता पाणी सुटले आहे. बघत राहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. परंतु दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार्‍या संघर्षाला राजकीय नेत्यांनी समोरे जाण्यास तयार राहावे," असा इशारा निळवंडे पाटपाणी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT