Pune News : Nitin Gadkari On Pune Development News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune News : पुणे-बंगळुरू महामार्गावरील बोगदा अन् उड्डाणपुलाची तारीख ठरली; संसदेत गडकरींची माहिती!

Nitin Gadkari On Pune Development News : "खंबाटकी घाटातील सहापदरी दुहेरी बोगद्याचे बांधकाम येत्या डिसेंबरपर्यंत होणार आहे."

Chetan Zadpe

Pune News : बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतिपथावर असून, हे काम यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली, तर याच मार्गावर कराड शहराजवळील साडेतीन किलोमीटर अंतराच्या सहापदरी उड्डाणपुलाचे 27 टक्के काम पूर्ण झाले असून, पूल पूर्णत्वाचा मुहूर्तही सांगितला. (Latest Marathi News)

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 च्या सहापदरीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच महामार्गावरील विविध सोयीसुविधांबाबत सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार श्रीनिवास पाटील यांनी रस्ते विकास मंत्रालयास तारांकित प्रश्न विचारला.

यामध्ये खासदार पाटील म्हणाले, "पुणे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी कामाची सद्यःस्थिती काय असून, शेंद्रे-कागल विभाग आणि शेंद्रे-पुणे विभाग दरम्यान किती काम पूर्ण झाले आहे. तसेच कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, त्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी संसदेत केली. नागठाणे, पारगाव आणि वेळे येथील उड्डाणपुलाचे काम, शिरवळ येथील ओव्हरब्रिज, उंब्रज येथील उड्डाणपूल, खंबाटकी घाटाजवळील एस-टर्नच्या ठिकाणचे बांधकाम लवकर पूर्ण करून महामार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली.

कराडचा सहापदरी उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार -

मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर दिले असून ते म्हणाले, "कराड येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, त्याचे 27 टक्के काम पूर्ण झाले आहे, तर ऑक्टोबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नागठाणे येथील अंडरपासचे काम हाती घेण्यात आले आहे. वेळे गावात उड्डाणपूल होणार आहे. खंबाटकी घाटातील सहापदरी दुहेरी बोगद्याचे बांधकाम येत्या डिसेंबरपर्यंत होणार आहे, तर पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपुलाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी डीपीआर करण्यात आल्याचे गडकरी यानी उत्तरामध्ये म्हटले आहे. याशिवाय उंब्रज येथील पारदर्शक उड्डाणपुलासाठी खा. श्रीनिवास पाटील यानी ना. गडकरी यांना समक्ष भेटून त्याच्या पूर्णतेसाठी विनंती केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाहनचालक-प्रवाशी वैतागले -

सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील सहापदरी बोगद्याचे आणि सातारा- कोल्हापूर महामार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील कामामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम सुरू होताना ठेकेदार कंपनीने वाहतूक कोंडीविषयी सुचविलेल्या उपाययोजना करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशी वैतागले आहेत. त्यामुळे या मार्गावरील काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत असून, वर्षअखेरीला या कटकटीतून सुटका होईल, असे मंत्री नितीन गडकरींनी संसदेत म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT