Kolhapur NCP : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादीचा झंझावाती चेहरा म्हणून केवळ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. केवळ मुश्रीफ यांचे नाव सोडले तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दुसरा चेहरा सांगणे सर्वसामान्य कार्यकर्त्याला कठीण होईल.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी राष्ट्रवादी केवळ दोन तालुक्यापूर्ती मर्यादित ठेवली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर पक्षाच्या राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात पार पडला. मात्र जिल्हास्तरावर राष्ट्रवादीचे किती मेळावे झाले हे सांगणे कठीण आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित कागलमध्ये मेळावा पार पडला. तर वर्षभरापूर्वी कागल येथे पक्षीय मेळावा पार पडला. हे दोन्ही मेळावे कागलमध्येच झाल्याने इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढणार कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. (Kolhapur NCP Hasan Mushrif News )
एकेकाळी जिल्ह्यातील पाच विधानसभा सदस्य, दोन खासदार, एक विधानसभा अध्यक्ष अशी राष्ट्रवादीची ताकद असताना आता दहापैकी सात विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नाही. लोकसभेला कोल्हापूरमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, महापालिकेसह गोकुळमध्ये काँग्रेसच्या कुबड्याशिवाय पर्याय नाही. अशी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची आहे. केवळ दोन विधानसभा मतदारसंघातच राष्ट्रवादीचा आमदार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या दहा वर्षापासून त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मोठी संधी होती. पण आपल्यापेक्षा कोणीही मोठा होऊ नये, भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची राहिली का? या शंकेला वाव मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी ज्यांची सभा घ्यायची झाल्यास ती कागलमध्येच का घेतली जाते? असा सवाल ही सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाली. त्याचवर्षी जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि चार आमदार पक्षाचे होते. दोन मंत्री, एक विधानसभा अध्यक्ष होते. हातकणंगलेतून 2009 मध्ये निवेदिता माने यांचा पराभव झाल्यानंतर त्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा पत्ताच नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी स्वतःच्या हिंमतीवर कागल विधानसभा मतदारसंघ सलग पाचवेळा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला. चंदगड मतदारसंघातही माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या पाठिंब्यावर आमदार राजेश पाटील विजयी झाले. राधानगरी-भुदरगडमध्ये मेहुण्या पाहुण्यांच्या वादात राष्ट्रवादी डबघाईला आली. कोल्हापूर (kolhapur) महापालिकेत अनेक वर्षे सत्तेत भागीदार असूनही कोल्हापूर उत्तर असो किंवा दक्षिणमध्ये पक्षाकडे विधानसभा लढवेल असा चेहरा नाही. शिरोळ, शाहूवाडी, हातकणंगले व करवीरमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
लोकसभेच्या तोंडावर पक्षात खांदेपालट झाले. पण ज्या बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना जिल्हा बँकेत सत्तारूढ गटातून बाजूला करण्यासापासून ते त्यांना पराभूत करण्यासाठी मुश्रीफ यांनी ताकद लावली, त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालण्याची वेळ आली. आसुर्लेकर हे पन्हाळा-शाहूवाडीतील पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, पण त्यांना उमेदवारी द्यायची म्हटली तर आमदार डॉ. विनय कोरे व मुश्रीफ यांच्यातील ‘दोस्ताना’ आड येत आहे.
Edited By - Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.