Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर जिहे - कठापूरचे पाणी माणगंगेकडे झेपावणार...

Amol Sutar

- रुपेश कदम

Jaykumar Gore : ज्या क्षणाची माण तालुका आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आला असून अयोध्देत प्रभु श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतानाच्या शुभ मुहूर्तावर जिहे - कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणातून आंधळी बोगद्यातून माणगंगेकडे झेपावणार आहे. आम्हा माणवासीयांसाठी हा आनंदाचा अन् हर्षोल्हासाचा क्षण आहे. सोमवारी रात्रीच हे पाणी आंधळी धरणात पोहचणार आहे.

आंधळी धरण भरुन सांडव्यावरून पाणी पडल्यावर 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाण्याचे पूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोनिया गोरे, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, दादासाहेब काळे, अर्जुन काळे, अरुण गोरे, संजय गांधी, किसन सस्ते, चिन्मय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, सध्या जिहे - कठापूर योजनेचे पाणी नेर धरणात सोडण्यात येत आहे. हे पाणी पुढे माण तालुक्यात नेण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा अन् चातकासारखी पाण्याची वाट पहाणाऱ्या माणमधील जनतेसाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे. उरमोडी, तारळी योजनांचे पाणी आणून 97 गावांमध्ये सिंचन सुविधा निर्माण करण्यात मला यश आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माणच्या पश्चिमेची तसेच नदीच्या उत्तर बाजूला असणारी गावे जिहे - कठापूरच्या पाण्याची वाट पहात होती. या योजनेला मी आमदार झाल्यापासून अधिकाधिक निधी मिळवला. एका नलिकेचे काम होवून हे पाणी आज आंधळी धरणात येत आहे. या योजनेचे नामकरण पंतप्रधान मोदींचे गुरु खटावचे स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे - कठापूर उपसा सिंचन योजना असे करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करुन लागणारा निधीही दिला आहे. गुरुंच्या नावे असलेल्या योजनेच्या पाण्याचे पूजन करायला पंतप्रधान मोदीही उत्सुक आहेत. 19 फेब्रुवारीला त्यांच्या हस्ते आंधळी धरणात पाणीपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माणगंगा नदीतून हे पाणी देवापूरपर्यंत जाणार आहे. उत्तर माणमधील 32 गावांसाठी वाढीव जिहे - कठापूर योजनेचे काम वेगाने सुरु असून हे पाणी हिंगणीपर्यंत नेणार आहे.

पांगरी, बिजवडी, शिंगणापूर ते डोंगराच्या वरचा पट्टा या योजनेत समाविष्ट नव्हता. त्यासाठी पाण्याचे फेरवाटप करुन सव्वा टीएमसी पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या गावांसाठी सातशे कोटींच्या योजनेला लवकरच मान्यता मिळणार आहे. आणखीही काही गावे जिहे - कठापूरच्या पाण्यापासून वंचित रहात आहेत. त्या गावांचे सर्वेक्षण करुन प्रत्येक गावाला पाणी देण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे.

सव्वा टीएमसी पाणी लाभदायक ठरणार...

उरमोडीचे पाणी कण्हेर कालव्यातून आणताना मोठ्या प्रमाणात वाया जात होते. मी ते पाणी कोंबडवाडीपर्यंत बंद नलिकेद्वारे आणण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आणि प्रस्ताव सादर केला. 750 कोटी खर्चून हे पाणी आता बंद नलिकेद्वारे येणार असल्याने वाया जाणारे सव्वा टीएमसी पाणी वाचणार आहे. यामुळे आवर्तनाची वाट पाहावी लागणार नाही व शेतकऱ्यांना गरज असेल तेव्हा पाणी आणता येणार आहे. तसेच जिहे - कठापूरचे पाणी आल्याने उरमोडीच्या पाण्यावर नदीकाठच्या गावांचा पडणारा बोजा कमी होणार आहे.

असाही योगायोग...

माण तालुक्यातील श्री क्षेत्र सीतामाई दंडकारण्य देवस्थान हे अतिशय पवित्र असे ठिकाण आहे. तसेच सीतामातेच्या मानेचा धक्का लागून प्रवाहित झालेली नदी म्हणून माणगंगेचा उल्लेख केला जातो. याच माणगंगेत जिहे - कठापूरचे पाणी आणण्यासाठी श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या शुभ मुहूर्त आमदार जयकुमार गोरे यांनी साधला आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT