पंढरपूर नगरपालिकेत प्रशांत परिचारक यांची १४ वर्षांची सत्ता उलथवत प्रणिता भालके ११ हजार मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
विजयानंतर प्रणिता भालके यांनी अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन ‘शिवरत्न’वर आशीर्वाद घेतले.
या भेटीमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Solapur, 26 December : पंढरपूर नगरपालिकेवरील माजी आमदार प्रशांत परिचारक यांची तब्बल 14 वर्षांची सत्ता उलथवून टाकून नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या प्रणिता भालके यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे ‘शिवरत्न’वर जाऊन आशीर्वाद घेतले. निवडणुकीपूर्वीही भालकेंनी मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. भालके-मोहिते पाटील भेटीने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आगामी झेडपी निवडणुकीत नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी पंढरपुरातील परिचारक यांच्या गडाला सुरुंग लावत प्रतिष्ठचे नगराध्यक्षपद खेचून आणले आहे. पंढरपुरातील विजयामुळे भालके गटाला मोठे टॉनिक मिळाले आहे. पोटनिवडणुकीपासून भालके गटाला लागलेले पराभवाचे ग्रहणही पंढरपुरातील दणदणीत विजयामुळे सुटले आहे.
पंढरपूर (Pandharpur) नगरपालिकेत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भगीरथ भालके यांनी निवडणूक लढवली होती. सत्ताधारी भाजपच्या उमेदवार श्यामल शिरसाट यांच्या पाठीशी संपूर्ण सत्ता होती. मात्र, बलाढ्य सत्तेशी भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांनी निकाराने झुंज दिली. त्यात भालके यांनी दणदणीत 11 हजार मतांनी विजय मिळविला.
बलाढ्य सत्तेला चीतपट करणारे भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांच्या पाठीशी कोणाचे पाठबळ आहे, याची चर्चा पंढरपुरात निकालानंतर सुरू झाली आहे. कारण पालकमंत्र्यांपासून आजी माजी आमदारांनी पंढरपुरात लक्ष घातले होते. संपूर्ण यंत्रणा शिरसाट यांच्या पाठीशी उभी होती. त्यानंतर भालकेंनी मिळविलेला विजय हा विशेष मानला जात आहे.
भालके यांनी निवडणुकीपूर्वी अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचाही समावेश होता. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली होती. त्या भेटीवेळी भगीरथ भालकेही उपस्थित होते. त्या भेटीचीही चर्चा झाली होती.
दरम्यान, नगरपालिका विजयानंतरही भालकेंनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर जाऊन विजयदादांचे आशीर्वाद घेतले. या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्येही मोहिते पाटील यांना साईड लाईनला टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मोहिते पाटलांनी पुन्हा आपला गट बांधायला सुरुवात केली आहे. तोंडावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर भालके-मोहिते पाटील भेटीने जिल्ह्यात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
प्र.1: पंढरपूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदी कोण निवडून आले?
उ: तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके नगराध्यक्षपदी निवडून आल्या.
प्र.2: भालकेंनी किती मतांनी विजय मिळवला?
उ: त्यांनी भाजप उमेदवाराचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव केला.
प्र.3: विजयानंतर भालकेंनी कोणाची भेट घेतली?
उ: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची अकलूजमध्ये भेट घेतली.
प्र.4: या भेटीचे राजकीय महत्व काय मानले जात आहे?
उ: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.