

कऱ्हाड नगरपालिकेत भाजपचा पराभव होत लोकशाही आघाडी–यशवंत विकास आघाडीची सत्ता आली असून राजेंद्रसिंह यादव थेट नगराध्यक्ष झाले.
निकालानंतर उपनगराध्यक्ष व तीन स्वीकृत नगरसेवकपदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
नियमांनुसार दोन स्वीकृत सदस्य आघाडीला आणि एक भाजपला मिळणार असून अनेक मातब्बर नावे चर्चेत आहेत.
Karad, 25 December : कऱ्हाड (जि. सातारा) नगरपालिका निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत सत्तांतर घडवत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंत विकास आघाडीची सत्ता आली आहे. थेट जनतेतून नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव यांची वर्णी लागली आहे. निवडणूक निकालानंतर आता पालिकेचे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी फील्डिंग लावली आहे. एका बड्या नेत्याची स्वीकृत सदस्यपदी निवड करून उपनगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची जोरदार चर्चा कऱ्हाडमध्ये आहे.
कऱ्हाड (Karad) नगरपालिका निवडणुकीत काहींना मेरीट असतानाही पराभवाला सामोर जावे लागले, तर काहींनी नेत्यांच्या आदेशानुसार निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याचे नेत्यांसमोर आव्हान असणार आहे. स्वीकृतसाठी सध्या लॉबिंग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदासाठी कोणाची वर्णी लागणार? याचीच शहरात सध्या चर्चा रंगली आहे.
नगरपालिकेची तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक झाली. त्यामुळे निवडणूकही रंगतदार झाली. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर, तसेच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांची लोकशाही आघाडी आणि माजी उपनगराध्यक्ष यादव यांच्या यशवंत विकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली. ही आघाडी केवळ दोन आठवड्यांतच उदयास आली.
आघाडीने तगडे उमेदवार दिले, त्यामुळे रंगतदार लढती झाल्या. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग तीनमध्ये साहेबराव शेवाळे व कश्मिरा इंगवले यांना उमेदवारी दिली. मात्र, तेथे दोघांचाही पराभव झाला. भाजपने जनशक्ती आघाडीला चार जागा दिल्या. तेथेही जनशक्तीला पराभवाला सामोरे जावे लागले.
निवडणुकीत लोकशाही-यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यादव यांना मतदारांनी कौल दिला, त्यामुळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर, काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकिर पठाण यांचा पराभव झाला. पालिकेत लोकशाही आघाडीचे १३, तर यशवंत विकास आघाडीचे सात नगरसेवक निवडून आले. तेजश्री पाटसकर या एकमेव अपक्ष निवडून आल्या. भाजपला केवळ दहा जागा मिळाल्या.
यशवंत आघाडीचे नेते यादव यांचे समर्थक हणमंत पवार यांनी या वेळी त्यांच्या पत्नी विजया पवार यांचा प्रभाग नऊमधून अर्ज दाखल केला. मात्र, नेत्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी अर्ज मागे घेतला. निवडणुकीत भाजपकडून निवडणूक रिंगणात असलेल्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान, अंजली कुंभार, संगीता शिंदे, काँग्रेसकडून उभ्या असलेल्या माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, माजी नगरसेवक आनंदा लादे यांच्यासह यशवंत विकास आघाडीच्या माजी नगरसेविका माया भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
लोकशाही आघाडीतून जनमत अजमावलेले जयंत बेडेकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे स्वीकृतमध्ये यांचा विचार हाेणार का? याकडे लक्ष लागून आहे.
नियम काय सांगतो?
पालिकेसाठी नगराध्यक्षांसह निवडून आलेल्या एकूण सदस्य संख्येच्या सहा टक्के किंवा पाच यापेक्षा जी कमी असेल ती संख्या घेऊन स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावे. त्यानुसार येथील पालिकेची संख्या ३.२ येते. त्यामुळे निवडून आलेल्या संख्याबळानुसार तीन स्वीकृत सदस्य घेता येतील. नियमानुसार निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार लोकशाही- यशवंत विकास आघाडीला दाेन व भाजपला एक स्वीकृत सदस्यपद घेता येईल.
चर्चेतील नावे
सुभाष पाटील, जयंत पाटील, सौरभ पाटील, हणमंत पवार, जयंत बेडेकर, नरेंद्र लिबे, भास्कर देसाई, भाजपचे विनायक पावसकर, स्मिता हुलवान यासह ऐनवेळी अन्य नावेही येण्याची शक्यता आहे.
उपनगराध्यक्षपदाची चर्चा
उपनगराध्यक्षपदी लाेकशाही आघाडीच्या नगरसेवकाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. यात जयवंत पाटील, प्रतापराव ऊर्फ पाेपटराव साळुंखे, अख्तर आंबेकरी, सुहास पवार यांची नावे चर्चेत आहेत. त्याशिवाय स्वीकृत सदस्य हाेऊन मातब्बर नेत्याची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची जोरदार चर्चा कऱ्हाडमध्ये आहे.
प्र.1: कऱ्हाड नगरपालिकेत सत्ता कुणाची आली?
उ: लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली.
प्र.2: नगराध्यक्ष म्हणून कोण निवडून आले?
उ: थेट जनतेतून राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्ष झाले.
प्र.3: स्वीकृत नगरसेवक किती असणार आहेत?
उ: नियमानुसार एकूण तीन स्वीकृत नगरसेवक घेतले जाणार आहेत.
प्र.4: उपनगराध्यक्षपदासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत?
उ: जयवंत पाटील, पोपटराव साळुंखे, अख्तर आंबेकरी, सुहास पवार तसेच एखादा स्वीकृत मातब्बर नेता चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.