Shahaji Patil
Shahaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahaji Patil News : ‘जातीवंत पाटलाची अवलाद हाय... पावणेदोनशे खोक्यांची जमीन पत्रावळ्यासारखी फेकली’

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : ‘कशाची खोकी आणि काय खोकी, हिथं आमच्यात डाळिंब, द्राक्षाची खोकी आहेत. मी जातिवंत पाटलाची अवलाद आहे. खोक्यांचं तर बोलत असाल तर अजितदादा, उद्धवसाहेबांना सांगतो. पावणे दोनशे खोक्यांची जमीन पत्रावळ्या फेकल्यासारखी सातबारा फेकलेली अवलाद आहे. ही इस्कटणारा कर्णाची अवलाद आहे. घरात घेऊन जाणारी नाय, तुम्ही साठवून ठेवा पोरांसाठी, नातवांसाठी. घरात तुमचं नासुन जाणार हाय. आमचं खळखळीत आले हिकडं, गेलं तिकडं" असे रोखठोक प्रतिउत्तर सांगोल्याचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार शहाजी पाटील यांनी (Shahaji Patil) दिले. (Pawar, Chavan had a plan to end Shiv Sena : Shahaji Patil)

सांगोल्याचे (Sangola) शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत असतात. सध्या सांगोला तालुक्यात ‘खासदार-आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार शहाजी पाटील हे दोघे सांगोला तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना आमदार पाटील बेधडकपणे बोलत होते.

शहाजी पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्याच्या राजकारणात पाऊल ठेवत असताना माझ्या समोर (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यासारखा बलाढ्य नेता उभा होता. त्यांना राजकीय विरोध करताना मी सांगोला तालुक्यातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवले. तालुक्याचा पाणी प्रश्न, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न यासह वर्षांनुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नावर निर्भीडपणे आवाज उठवून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

माझी भूमिका स्पष्ट आणि प्रामाणिक असल्याने सांगोला तालुक्यातील जनतेने कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्यावर प्रेम केले. या लोकांचे प्रेम हेच आपले भांडवल आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत किंवा अजित पवार यांनी आणि आपल्या अन्य राजकीय विरोधकांनी कितीही माझ्यावर खोक्यांचा आरोप केला, तर सांगोला तालुक्यातील जनतेला माहीत आहे. आपला नेता खोक्याचा नाही; तर स्वाभिमानाचा भुकेला आहे. त्यामुळे कुणी कितीही टीका केली तर त्यांना आपण राजकीय मैदानात व्यासपीठावरून उत्तर देऊ, असेही शहाजी पाटलांनी बोलून दाखवले.

या लोकांचा शिवसेना संपवण्याचा डाव होता...

अजितदादा, पवार साहेब, जयंत पाटील, अशोक चव्हाण आदी नेत्यांचा हळुवारपणे शिवसेना संपवण्याचा प्लॅन सुरू होता. आमचे त्या वेळचे नेते उद्धव साहेबांच्या आजारपणाचे कारण पुढे करून शिवसेनेचे आगामी काळात दहा ते पंधराच्या वर आमदार जाऊ द्यायचे नाहीत, असा प्लॅन होता. परंतु आमचे नेते एकनाथ शिंदेंना आम्ही शिवसेनेचे नेतृत्व दिल्यामुळे आमची शिवसेना वाढणार व सगळ्याच निवडणुका भरघोस मताने जिंकणार, असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT