Ramraje Naik-Nimbalkar - Ranjeetsinha Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Panchayat Samiti : फलटणमध्ये प्रचंड धक्कादायक राजकारण : पंचायत समितीत रामराजे अन् रणजितसिंह निंबाळकरांचा गट एकत्र सत्तेत

Phaltan Panchayat Samiti : फलटण पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या शिवांजली भोसले यांची सभापतीपदी तर शिवसेनेच्या अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

Hrishikesh Nalagune

Phaltan Panchayat Samiti : प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर फलटण पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादीच्या शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची भाजपच्या पाठिंब्यावर सभापती तर शिवसेनेच्या अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी निवड झाली.

शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर निवडून आल्या आहेत, मात्र निवडीनंतर त्या आपल्याच सभापती असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. त्याचवेळी शिवांजली यांचे वडील विक्रमसिंह भोसले यांनी निवडीनंतर लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांनी शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्याच सभापती असल्याचा दावा केला आहे. त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे फलटणचा सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे. उपसभापती पदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची निवड झाली आहे. जिल्ह्यात 6 पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाले आहेत, असाही दावा पाटील यांनी केला.

रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत :

ईश्वर चिठ्ठीवर सभापतीपदाची संधी असताना शिवसेनेने अर्थात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने सभापती सोडून उपसभापतीपद पदरात पाडून घेतले. शिवसेनेने उपसभापतीपद मागितले होते, असा दावा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. तर सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केला.

या सगळ्या घडामोडीनंतर रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंहनाईक निंबाळकर या दोन्ही गटांमध्ये सेटलमेंटचे राजकारण झाल्याचे बोलले जाते. निवडणुकीपूर्वी विरोधात लढलेले हे दोन गट एकत्र येण्यामागे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर असल्याचे सांगितले जाते.

पाटील बंधूंनी यांनी मागील २ दिवसांपासून फलटणच्या राजकारणात बाईकाने लक्ष घातले होते. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे शिवरुपराजे खर्डेकर आणि विक्रमसिंह भोसले या दोघांनाही पाटील यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी पाठवले. त्यानंतर शिवसेनेने सभापतीपद सोडून केवळ उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला.

पण याच निवडीनंतर शिवांजली यांचे वडील विक्रमसिंह भोसले यांनी निवडीनंतर लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे फलटणच्या राजकारणात कमालीचा ट्विस्ट आला आहे. त्यानंतर लगेचच शिवरूपराजे खर्डेकर यांनीही राष्ट्रवादीच्या फलटण तालुकाध्यक्षाचा राजीनामा दिला आहे. निवडीपूर्वीचे राजकारण आणि निवडीनंतर बदलले राजकारण यामुळे फलटणची जनता सध्या कमालीची गोंधळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT