Mahayuti Solapur Meeting Sarakranama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti News : सोलापुरात महायुतीचे 14 जानेवारीला शक्तिप्रदर्शन!

Mahayuti Solapur Meeting : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताकद दाखविण्याचा निर्धार;

Mayur Ratnaparkhe

Solapur News : राज्यात सत्तेत आलेल्या भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीच्या नेत्यांची मंगळवारी सोलापुरात पहिलीच बैठक झाली. या बैठकीत येत्या 14 जानेवारी रोजी सोलापुरात महायुतीचा महामेळावा घेऊन विरोधकांना ताकद दाखवून देण्याचा निर्धार करण्यात आला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बैठकांना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापुरात महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तीनही पक्षाचे खासदार, आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

राज्यात सत्तेत असलेल्या या तीनही पक्षाच्या नेत्यांची सोलापुरात पहिल्यांदाच एकत्रित बैठक झाली. महायुतीचे(Mahayuti नेते यावेळी जोशात असल्याचे दिसून आले. याच बैठकीत येत्या 14 जानेवारी रोजी सोलापुरात तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले‌. या मेळाव्याच्या माध्यमातून विरोधकांना ताकद दाखवण्याचेही ठरलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील काळातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकमताने काम करण्याचा निश्चय करण्यात आला. येत्या 14 जानेवारीला महामेळाव्याच्या निमित्ताने महायुती शक्तीप्रदर्शन करणार हे मात्र नक्की. कारण या महामेळाव्यासाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ताकद लावली आहे.

राज्यस्तरावरील नेते एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे. एकमेकांमधील मतभेद मिटावेत आणि लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकोप्याने काम करावे, यासाठी या तीनही पक्षाकडून राज्यभरात पावले उचलली जात आहेत. त्याच अनुषंगाने सोलापुरातही आता तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी हातात हात घालून काम करण्याचा निर्णय या बैठकीतील महायुतीच्या नेत्यांनी घेतला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेने(ठाकरे गट) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या घरी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांची अशी एकत्रित बैठक झाली नव्हती. ती कधी होणार अशी चर्चा असतानाच ही बैठक झाली आणि या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांना ताकद दाखवून देण्याची भाषा केली.

या बैठकीला खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, महायुतीचे समन्वयक तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने सोलापूर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महेश साठे, कल्याणराव काळे, धैर्यशील मोहिते पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, दिलीप कोल्हे या मान्यवरांसह तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय, माजी मंत्री सदाभाऊ खोत गट, रिपब्लिकन आठवले गट, शिवसंग्राम आणि प्रहार पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT