Praniti shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha Result : प्रणिती शिंदेंनी रोखली भाजपची हॅट्‌ट्रीक; सातपुतेंचा 74 हजार मतांनी केला पराभव

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंंदे यांनी ७४ हजार १९७ मतांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करत भाजपची घौडदौड रोखली. पहिल्या फेरीपासून शिंदे यांनी घेतलेली आघाडी मधल्या तीन फेऱ्या वगळता शेवटपर्यंत आघाडी घेतली आणि अखेर ७४ हजार मतांनी विजय मिळवत भाजपची हॅटट्रीक रोखली. प्रणिती शिंदे यांना ६ लाख २० हजार २२५ मते मिळाली आहेत, तर राम सातपुते यांना ५ लाख ४६ हजार ०२८ मते मिळाली आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मंगळवारी सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा टपाल मतदानाची मोजणी करण्यात आली. टपाल मतदानापासूनच प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीपर्यंत शिंदे ह्या १४ हजार मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, चौथ्या फेरीत ते मताधिक्क्य ३८८४ पर्यंत खाली आले. म्हणजे चौथ्या फेरीपासून आमदार सातपुते (Ram Satpute) यांनी मताधिक्क्य घेण्यास सुरुवात केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाचव्या फेरीअखेर राम सातपुते यांनी २६८० मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी सातव्या फेरीपर्यंत कायम होती. सातव्या फेरीअखेर राम सातपुते यांची आघाडी पाच हजार मतांची होती. मात्र, सहाव्या फेरीपासून पुढे प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली, ती पुढे शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. मधल्या तीन फेऱ्या वगळता प्रणिती शिंदे यांनी पहिल्यापासून आघाडी कायम राखली.

आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचा गड नेस्तनाबूत करताना अक्कलकोट आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ वगळता मतदारसंघातील उर्वरीत चार मतदारसंघात आघाडी घेतली आहे. यामध्ये मोहोळमधून प्रणिती शिंदे यांना १, लाख २८ हजार २८७ मते मिळाली, तर राम सातपुते यांना ६४ हजार ९३८ मते मिळाली आहेत. शहर उत्तरमधून शिंदे यांना ७१ हजार ४२८, तर सातपुते यांना १ लाख ०६ हजार ७८३ मते मिळाली आहेत.

आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती यांना ९० हजार ४६८, तर सातपुते यांना ८९ हजार ६७२ मते मिळाली आहेत. अक्कलकोटमध्ये शिंदे यांना ९७,६८४, तर सातपुते यांना १, ०७,२५१ मते, दक्षिण सोलापूरमध्ये प्रणिती यांना १,०५,४७४ मते, तर राम सातपुते यांना ९६,०३८ मते मिळाली आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिंदेंना १,२४,७११ मते, तर सातपुते यांना ७९,२८८ मते मिळाली आहेत. पोस्टलमध्ये प्रणिती शिंदे यांना १८७५ मते, तर सातपुते यांना १२५८ मते मिळाली आहेत.

सोलापूरमध्ये मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तत्पूर्वी २००४ च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांचा भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला हेाता. या तीनही पराभवाचा वचपा प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीत काढल्याचे मानले जात आहे.

मतमोजणी संथ गतीने

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही मतदारसंघाचा अंतिम निकाल हा दुपारी तीनपर्यंत हाती येईल, असे सांगितले होते. मात्र, सोलापूरचा निकाला जाहीर व्हायला रात्रीचे पावणे नऊ झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT