Praniti Shinde-Dilip Mane-Suresh Hasapure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dilip Mane : प्रणिती शिंदेंनी दिलीप मानेंचे कौतुक करताच सुरेश हसापुरे व्यासपीठावरून उठून गेले...

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 August : दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या सत्कार समारंभात कोपरखळ्या आणि टीका टिपण्णींनी रंगत आणली. त्याचवेळी विधानसभेच्या तिकिटावरून होणाऱ्या संभाव्य रुसवे-फुगव्यांची झलकही या कार्यक्रमात पाहायला मिळाली.

खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने आणि त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांचे लोकसभा निवडणुकीत हद्दवाढ भागातून मिळालेल्या मताधिक्क्याचा उल्लेख करून कौतुक करताच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा दक्षिणमधील दुसरे इच्छुक सुरेश हसापुरे हे कानाला मोबाईल लावून उठून गेले.

माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी दिलीप माने यांचे कौतुक करण्याबरोबरच पूर्वीची चूक सुधारली म्हणत मध्यंतरी काँग्रेस पक्ष सोडल्याची जाणीवही माने यांना करून दिली.

त्याचवेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी त्यात सुधारणा करत माणसं चुकतात. पण त्या चुका दुरुस्त करणे महत्वाचे आहे, असे सांगून मानेंनी केलेली काँग्रेस प्रवेशाच्या दुरुस्तीबाबत भाष्य केले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी भाषणात माजी आमदार दिलीप माने यांचे कौतुक केले. लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या हद्दवाढ भागात दिलीप माने आणि पृथ्वीराज माने यांच्यामुळेच मताधिक्य मिळाले आहे. भाजपबहुल भागातही माने यांच्या प्रयत्नांमुळेच काँग्रेसला मतदान मिळाले आहे, अशा शब्दांत खासदार शिंदे यांनी माने यांचे कौतुक केले.

प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप मानेंचे कौतुक सुरू असताना दक्षिण सोलापूरमधून विधानसभेसाठी इच्छूक असलेले काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे मोबाईल फोन कानाला लावत व्यासपीठावरून उठून बाहेर निघून गेले, त्यामुळे दिलीप माने यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीतील तिकिटानंतरची झलक दिसून आली.

सिद्धेश्वर सहकारी साखर काखान्याचे माजी अध्यक्ष तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनीही भाषणातून माजी आमदार दिलीप माने यांना कानपिचक्या दिल्या. दिलीप माने, तुमच्या नावापुढे आमदारपदाचे लेबल लागले आहे. हे आमदारपदाचे लेबल लागण्याच्या प्रतीक्षेत अनेकजण आहेत (या वेळी काडादी यांनी थेट सुरेश हसापुरे यांचे नाव घेतले). त्यांच्यासाठीही माने यांनी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला.

या सत्कार सोहळ्यास मागील निवडणूक दक्षिण सोलापूरमधून लढवलेले बाबा मिस्त्री, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके आदी नेत्यांची अनुपस्थिती दिसून आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT