Praniti Shinde-Uddav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : ठाकरेंच्या आवाहनाला शिंदेंनी दाखवला 'कात्रज'चा घाट; काँग्रेस कार्यकर्ते अपक्षाच्या मदतीला!

Congress workers support independent as Shinde ignores Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेल्या अनुकूल परिस्थितीचा सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा उचलता आलेला नाही.

Vijaykumar Dudhale

Solapur, 19 November : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून कानपिचक्या देऊनही काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे ह्या शिवसेनेचे सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारात शेवटपर्यंत सहभागी झाल्याच नाहीत.

उलट ठाकरेंच्या आवाहनाला शिंदेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कात्रजचा घाट दाखवत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत दिसलेली एकी विधानसभेत मात्र बेकीत रुपांतरित झाली, त्याचा फटका महाआघाडीला बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेल्या अनुकूल परिस्थितीचा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील काही मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा उचलता आलेला नाही. महाविकास आघाडीतील मतभेदाचा फायदा आपसूकपणे महायुतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून (Solapur South Constituency) काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, त्यांना पक्षाचा एबी फार्म मिळाला नव्हता. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे सोलापूर दक्षिणमूधन महाविकास आघाडीकडून अमर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

अमर पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोलापूरमध्ये सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी केलेल्या कामाची आठवण करून देत प्रणिती शिंदे यांना सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या दोन ते तीन सभा सोडून मी प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापुरात आलो होतो, त्यामुळे प्रणिती शिंदे यांनीसुद्धा अमर पाटील यांच्या प्रचारात आता उतरलं पाहिजे, असे ठाकरे यांनी जाहीरपणे प्रणिती शिंदे यांचे कान टोचले होते.

उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आवाहन करूनही प्रणिती शिंदे ह्या शेवटपर्यंत सोलापुरात शिवसेनेच्या प्रचारात उतरल्याच नाहीत. खासदार शिंदे यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके, चेतन नरोटे यांच्यासाठी सभा घेतल्या. मात्र त्या शेवटपर्यंत दक्षिण सोलापूर मतदारसंघात फिरकल्याच नाहीत. काँग्रेस पक्षाचे नेतेच शिवसेनेच्या प्रचारापासून दूर राहिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही घ्यायचा तो बोध घेतला.

काँग्रेसमधील बहुतांश नेते आणि कार्यकर्ते हे दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या धर्माला हरताळ फासत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या या भूमिकेचा निषेध म्हणून शिवसेनेनेही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार टाकला.

एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यात जे अनुकूल वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने तयार झाले होते, त्याचा फायदा आघाडीतील पक्षाला उचलता आलेला नाही. लोकसभेला प्रामणिकपणे काम करूनही विधानसभेला मदत मिळू शकली नाही, याची खंत शिवसेनेला कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT