Prashant Paricharak-Kalyan Kale-Balraje Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Governor Quota : राज्यपाल नियुक्त आमदारकीची लॉटरी कोणाला...? परिचारक, काळे, पाटलांची ‘हायकमांड’कडे फिल्डिंग!

Mahayuti Leader News : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा विषय मार्गी लावण्याचे सूतोवाच महायुती सरकारच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, त्यामुळे या 12 जागांच्या निवडीकडे इच्छुक नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 24 July : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचे लक्ष राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीकडे लागले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांच्यासाठी आमदार यशवंत माने हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कोणाला लॉटरी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या (Governor Appointed MLC) निवडीचा विषय मार्गी लावण्याचे सूतोवाच महायुती सरकारच्या (Mahayuti Government) नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, त्यामुळे या 12 जागांच्या निवडीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेले नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः ज्या नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित आहेत, त्या नेत्यांनी पाठीमागच्या दारातून पुन्हा विधिमंडळात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीसाठी चर्चा होती. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विचार झाला नव्हता. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत प्रशांत परिचारक यांना संधी मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे.

परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठकही झाली. त्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर संधी दिली तर पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विधानसभा उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परिचारक यांना संधी मिळाली नाही तर मात्र त्यांच्यावर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढू शकतो. त्यामुळे परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपमधील अंतर्गत वाद मिटविण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होऊ शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंढरपूरमधील नेते कल्याण काळे यांच्या समर्थकांनीही पक्षाकडे काळे यांच्यासाठी विधान परिषदेची मागणी केली आहे. पक्षाकडून त्यांना संधी मिळते की नाही, हे पाहावे लागेल. काळे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

बाळराजेंसाठी आमदार उतरले मैदानात

माजी आमदार राजन पाटील यांचा मोहोळ मतदारसंघ आरक्षित आहे. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याचे कर्तव्य पाटील यांनी आजपर्यंत चोखपणे बजावले आहे, त्यामुळे पाटील कुटुंबीयांमध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. आता खुद्द आमदार यशवंत माने यांनी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांना संधी मिळावी, यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सोलापूरमधील कोणकोणाला लॉटरी लागणार?, याकडे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT