Mangalvedha, 01 July : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे गणित सोडवण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, असे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात होते. मात्र, विधान परिषदेच्या उमेदवारीपासून त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे परिचारक यांच्या पुढे आता विधानसभेचा पर्याय असणार आहे. परिचारक विधानसभेची निवडणूक लढवण्याचे मोहिते पाटील यांच्या प्रमाणे धाडस दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे
विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 2 जुलै हा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच भाजपने आज एक दिवस अगोदरच पाच उमेदवारांची नावे विधान परिषदेसाठी घोषित केले आहेत. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार परिणय फुके आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे.
पंढरपूर मंगळवेढा (Pandharpur-Mangalvedha) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवर प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचा हक्क होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी त्यांनी तो सोडून दिला. उमेदवारीवरील हक्क परिचारकांनी सोडला खरा पण भाजपने त्यांना अद्याप कुठल्याही पदावर संधी दिलेली नाही. असे असूनही परिचारक यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत काम केले आहे, त्यामुळे विधान परिषदेसाठी परिचारक यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
विधान परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून तिघांना संधी देण्यात आली आहे. त्यात प्रशांत परिचारक यांचे नाव नसणे, हे काहीसे धक्कादायक समजले जात आहे. प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून सध्या पंढरपूरमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवची कारणे जाणून घेत असतानाच विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेतला जात आहे. त्या बैठकांमध्ये अनेक कार्यकर्त्यांकडून प्रशांत परिचारक यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. मात्र, प्रशांत परिचारक यांनी त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
विधान परिषदेच्या उमेदवारीत डावलण्यात आल्यामुळे प्रशांत परिचारक यांच्यापुढे विधानसभेचा पर्याय असणार आहे. भाजप त्यांना संधी देणार का, हा खरा प्रश्न आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचाही दावा उमेदवारीसाठी असू शकतो. मात्र, पक्ष कोणाला संधी देणार, हेही पाहावे लागणार आहे.
ढरपूरमध्ये हे दोघे आजी-माजी आमदार असताना लोकसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हेही भाजपसोबत आले आहेत, विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस नेमके कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.