Solapur Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : सोलापुरात काँग्रेसकडून 62 जणांची विधानसभा लढविण्याची तयारी; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावरही डोळा

Assembly Election 2024 : उमेदवारी अर्जाच्या मागणी सोबत इच्छुकांकडून प्रत्येकी 20 हजार रुपयांची वर्गणी काँग्रेसने गोळा केली आहे, त्यातून तब्बल 12 लाख 40 हजार रुपये वर्गणी जमा झाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 August : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील सर्व 288 मतदार संघातील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत‌. सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून सुमारे 62 इच्छुकांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसकडे असलेल्या तीन मतदारसंघाबरोबरच, मित्रपक्षाच्या मतदारसंघातही काँग्रेसमधील इच्छुकांनी दावेदारी केली आहे, त्यामुळे जागा वाटपावेळी उमेदवारीचा मुद्दा कळीचा ठरणार आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक वीस जणांनी काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्यानंतर सोलापूर शहर मध्य मतदार संघातून 18 जणांनी निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे.

अक्कलकोट (Akkalkot) मतदार संघातून यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांना उमेदवारीसाठी युवा नेते मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह चौघांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे, त्यामुळे अक्कलकोटमध्ये यंदा प्रथमच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. या तीन मतदारसंघाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारसंघातूनही काँग्रेसमधील इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.

यामध्ये सोलापूर शहर उत्तर, मोहोळ, माढा, पंढरपूर-मंगळवेढा, बार्शी आणि माळशिरस या मतदारसंघाचा समावेश आहे. आता यातील कोणते मतदारसंघ काँग्रेस लढवणार आणि तर कोणते मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणारे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्जाच्या मागणी सोबत इच्छुकांकडून प्रत्येकी 20 हजार रुपयांची वर्गणी काँग्रेसने गोळा केली आहे, त्यातून तब्बल 12 लाख 40 हजार रुपये वर्गणी जमा झाली आहे. या माध्यमातून काँग्रेसने निवडणूक निधीसाठी संकलनाची मोहिम सुरू केल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दक्षिण सोलापूरमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. या मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मागील वेळी निवडणूक लढवलेले बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, महादेव कोगनुरे, अशोक देवकाते ही प्रमुख नावे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील शालिवाहन माने देशमुख हेही दक्षिणमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

म्हेत्रेंना यंदा तिकिटासाठी स्पर्धा

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, भीमाशंकर जमादार, पूजा पाटील यांनीही उमेदवारी मागितली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातही इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहेत. यात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह माजी महापौर संजय हेमगड्डे, आरिफ शेख, देवेंद्र भंडारे अशी भली मोठी रांग मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रसकडून इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदार संघातूनही काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, सुदीप चाकोते, सुनील रसाळ, सुशील बंदपट्टे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. मोहोळमधूनही काहींनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

माढ्यातून माजी आमदारांच्या सूनबाई तयारीत

माढ्यामधूनही माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सूनबाई मीनल साठे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी चालवली आहे. त्याचबरोबर पंढरपूर-मंगळवेढा, बार्शी आणि माळशिरस मधूनही काही लोकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागणी करणारा अर्ज भरला आहे.

भगीरथ भालकेंनी काँग्रेसकडे उमेदवारीच मागितली नाही

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी मात्र काँग्रेसकडे अद्यापही उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे भालके नेमके कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, याचा कोणताही थांगपत्ता भगीरथ भालके यांनी लागू दिलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT