Pune News : मंत्र्यांच्या नातेवाइकांपासून सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांपर्यंत बुलडोजर पोहोचविणाऱ्या पुणे महापालिका प्रशासनाने आता अतिक्रमण कारवाईबाबत नवा आदेश काढला आहे. दुकानांचे अधिकृत नामफलक काढू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले असून, कारवाई केवळ रस्ते, फुटपाथ आणि फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांवरच करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या धडाक्यात व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत काही ठिकाणी अतिक्रमण हटविण्याऐवजी दुकानांचे नामफलक काढले जात असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे दुकानांचे नामफलक काढू नयेत, अशी मागणी केली होती. बिडकर यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत संबंधित अधिकारी आणि कारवाई पथकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अतिक्रमण हटाव मोहिमेने वेग घेतला आहे. सभागृहात अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असतानाच प्रशासनाने सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही कारवाई केली. मंत्र्यांच्या नातेवाइकांच्या अतिक्रमणांपासून नगरसेवकांच्या निकटवर्तीयांच्या बांधकामांपर्यंत कारवाई पोहोचल्याने राजकीय दबावाला प्रशासन जुमानत नसल्याचा संदेश गेला.
आयुक्त नवल किशोर राम यांनी मार्च 2027 पर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. प्रमुख रस्ते, चौक, पदपथ आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरू आहे. पुन्हा अतिक्रमण केल्यास अधिक कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
या धडक मोहिमेदरम्यान दुकानांचे नामफलकही काढले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता दुकानांच्या भिंतीवरील नामफलक काढू नयेत, तर फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामे, रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणे नियमानुसार हटवावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
फुटपाथवर किंवा फुटपाथलगत उभारलेले अनधिकृत साईनबोर्ड, जाहिरात फलक आणि इतर अतिक्रमणांवर मात्र कारवाई कायम राहणार आहे. संबंधित सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह निरीक्षक आणि कारवाई पथकांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
अतिक्रमण हटवताना राजकीय हस्तक्षेप चालणार नाही, असा कठोर पवित्रा प्रशासनाने घेतला असतानाच दुकानांचे नामफलक काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मोहिमेत आता बुलडोजर त्याच वेगाने चालणार का, की नवनवीन आदेश येऊन त्यात अडथळा निर्माण होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.