Radhanagri Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhanagri Assembly : कार्यकर्त्यांच्या दबावानंतर राधानगरीसाठी काँग्रेसच्या पहिलवानाने लावली लंगोट; आर. के. मोरेंची विधानसभेसाठी सहमती

Rahul Gadkar

Kolhapur, 24 July : लोकसभा निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते गृहीत धरून अनेकांनी इकडून तिकडे उड्या मारल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत उपऱ्या उमेदवाराला संधी नको, अशी भूमिका राधानगरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हाच धागा पकडत गेल्या पंधरा दिवसांपासून तीन ते चार वेळा काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोण उमेदवार असावा, याबाबत बैठकीत सल्ला मसलत झाली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन राधानगरी (Radhanagri) विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून (Congress) गोकुळ दूध संघाचे संचालक आर. के. मोरे यांना उमेदवारी मिळविण्याबाबत एकमत झाले आहे. मोरे यांचे वडील आमदार राहिल्याने त्यांना विधानसभेचा पूर्वानुभव आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर मोरे यांनीही लढण्यास सहमती दर्शवली आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी लढण्यास तयार आहे. काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकसंघ होऊन प्रतिष्ठा पणाला लावली आणि पाठबळ दिले, तर मी हे शिवधनुष्य पेलण्यास तयार आहे, असे ‘गोकुळ’चे संचालक आर. के. मोरे यांनी जाहीर केले आहे.

राधानगरी तालुक्यातील करंजफेन येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आर. के. मोरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सहमती दाखवली आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ‘भोगावती’चे माजी संचालक दत्तात्रेय पाटील हे होते.

भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून राधानगरी हा मतदारसंघ काँग्रेसशिवाय आम्ही लढवत आहोत. यावेळी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या हात या चिन्हावरच लढायचा असून सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तर सर्वांनी आणि मित्रपक्षांनी एकसंघ राहून कार्य करूयात.

मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे ए. डी. पाटील, सुधाकर साळोखे, अशोकराव साळोखे, समन्वयक सुशिल पाटील यांची भाषणे झाली. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जिद्दीने सहकार्य करणार असतील, तर हे दिव्य मी पार पडण्यासाठी तयार आहे, असे मोरे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहावर सांगितले. मेळाव्याला मोहन धंदरे, बाजीराव चौगले, सागर धुंदरे, डी. एस. पाटील, अभिजीत पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Editing : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT