Kolhapur Political News : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.विकास कामावरून बोलताना क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडाडून टीका करत पक्षाच्या 50 कोटीवरून देखील निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री शिंदे रस्त्यावर फिरतात म्हणून त्यांना समस्या माहीत आहेत. पूर्वीच्या अडीच वर्षात ऑनलाईन मुख्यमंत्री पाहायला मिळाले. ते रस्त्यावर आले असते तर गेल्या अडीच वर्षातच प्रश्न संपले असते. चुकीच्या पद्धतीने नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा आपली सत्ता होती, तेव्हा आपण काय केलं याचा आत्मचिंतन करावें. तुम्ही करायचं काय नाही, आणि दुसऱ्यांचे माप काढायचे असले धंदे सुरू आहेत, अशा शब्दात राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.
अडीच वर्षात तुम्ही मुख्यमंत्री असताना निधी आणण्यासाठी आम्ही झिजलो. शिवसेनेच्या (Shivsena) आमदार खासदारांना त्यांनी निधी दिला का? त्यांना सक्षम केले का? राज्यात शिवसेनेचे 18 खासदार 53 आमदार निवडून दिले होते, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला सक्षम करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यांनी हे केलं नसतं तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असा हल्लाबोल क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मी काय बोलणार? आता ज्यावेळी दौऱ्यावर येतात त्यावेळी चौक शोधावा लागतो, हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यांनी टिकेची पातळी सोडली आहे, त्यांच्या तोल सुटला आहे. त्यांचं वय नसेल इतकं वर्षे मी शिवसेनेत काम केलं आहे. आपलं काय चुकतंय त्याचं आत्मपरीक्षण आदित्य ठाकरे यांनी करावं. त्यांच्यावर दिशा सलीयनचे आरोप झाले ते सत्य म्हणायचे का? आता त्यांचा तोल सुटला आहे, उरले सुरले ही आमच्याकडे येतील, असेही क्षीरसागर म्हणाले.
शिवसेनेच्या 50 कोटीवरून बोलताना, राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आम्हाला 50 खोके म्हणणाऱ्यांनी आमच्याकडून खोके मागितले. पक्षाचे पैसे त्यांनी घेतले त्यांच्यावर कारवाई होईल. मुख्यमंत्री शिंदे योग्य तो निर्णय घेतील. आम्हाला पैशाची गरज नाही, समाज सेवा करण्याची इच्छा असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. वर्षानुवर्षे न सुटलेले प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडवले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली. कोणत्याही समाजाला धक्का न लागता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. पण आघाडी प्रणित नेत्यांनी खो घालण्याचा प्रयत्न केला.
मराठा समाजात दुफळी तयार करणाऱ्या नेत्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही. इतके वर्षे गड पहिला नाही, पण आता गडावर जावं लागतंय. मात्र, जनतेला सर्व परिस्थिती कळत आहे. अशा शब्दात क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.