Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane FRP News: 'स्वाभिमानी' पुन्हा रोखणार पुणे-बंगळुरू महामार्ग ? आता सांगलीतील कारखानदार रडारवर

Rahul Gadkar

Sangli News: कोल्हापूरच्या पद्धतीनुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी मागील हंगामात तुटलेल्या उसाला आणि योग्य ऊसदर देण्यास नकार दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा पुणे-बंगळुरू महामार्ग पेठ नाका येथे रोखणार असल्याचा इशारा दिला आहे.

इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी 8 डिसेंबरला जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शब्द पाळावा, असे आवाहन आता करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील गळीत हंगामाला गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला असेल, तर त्यांनी प्रतिटन 50 रुपये द्यावेत, तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखानदारांनी प्रतिटन 100 रुपये द्यावेत, तसेच यावर्षीच्या गळीत हंगामासाठी एक रकमी तीन हजार 100 रुपये दर दिला पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले होते.

सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी यांची शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर अजून कोणतीही हालचाल दिसत नाही. प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे 'स्वाभिमानी' पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

कारखानदारांची शुक्रवारी बैठक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पद्धतीनुसार दर देण्यास नकार दिल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. मात्र, शुक्रवारच्या बैठकीत जिल्हाधिकारी कोणता तोडगा काढणार आहेत, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT