Ration shopkeepers agitation
Ration shopkeepers agitation sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : रेशन दुकानदारांच्या आंदोलनात शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदेंनी काढले चिमटे...

Umesh Bambare-Patil

Satara News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या रेशन दुकानदारांच्या आंदोलनात आज भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde एकाच वेळी पाठींबा देण्यासाठी उपस्थिती राहिले. विरोधी व सत्ताधारी आमदारांचा पाठींबा या आंदोलनाला मिळाला. त्यामुळे आगामी काळात विधानसभेत व विधान परिषदेत आवाज उठवून रेशन दुकानदारांच्या मागण्यांचा पाठपुरावा जिल्ह्यातील हे दोन्ही आमदार निश्चित करतील, असा विश्वास रेशन दुकानादारांतून व्यक्त होत आहे.

रेशन दुकानदारांनी आज डीबीटी योजना बंद करावी, कार्ड धारकांना वाटप करण्यासाठी केरोसिन पुन्हा सुरु करावे, कोरोनाकाळातील २०२१, २०२२, २०२३ सालातील १७ महिन्यांचे मोफत धान्य वाटपाचे कमिशन रेशन दुकानदारांना मिळालेले नाही. हे कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यावर जमा करावे, एफसीआय गोडाऊन मधील धान्य व पोत्याच्या वजनाप्रमाणे धान्य मिळावे, महागाईनुसार रेशनदुकानदारांना कमिशन वाढवून मिळावे, आदी मागण्यांसाठी साताऱ्यात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

या आंदोलनात जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष श्रीकांत शेटे, उपाध्यक्ष बबनराव देवरे, संजय रजपूत, सचिव प्रमोद तपासे, तसेच पुण्याचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल, कराडचे अशोकराव पाटील, माणचे भगवानराव गोरे, फलटणचे सिराज शेख, वाईचे अनिल मांढरे, पाटणचे बाबूराव पाटील, कोरेगावचे राजेंद्र भोईटे, महाबळेश्वरचे अजित कासुर्डे, खंडाळ्याचे अप्पासाहेब तोडकरी, खटावचे तुकाराम भादुले, जावळीचे राजेंद्र भिलारे,यांच्या मोठ्यासंख्येने रेशन दुकानादार सहभागी झाले होते.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, नवीन जाचक अटी व कायद्याला धरुन एक संशय व्यक्त करण्याचे काम सरकारने केले आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत आहोत. अधिवेशनात रेशन दुकानदार, ग्राहकांना डीबीटी योजना बंद करा, पैसे नको धान्य द्या, केशरी कार्डधारकांना धान्य चालू करा, रेशन वाटपाचे कमिशन लवकरात लवकर मिळावे, यासाठी आम्ही मुद्दे मांडले. या मोर्चाला राष्ट्रवादी पक्ष व माझ्यावतीने पाठींबा देतो.

दरम्यान, हे भाषण सुरु असतानाच भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे तेथे दाखल झाले. यावर आमदार शिंदे म्हणाले, आज योगायोग आहे की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे दोन आमदार तुमच्या आंदोलनाला पाठींबा देत आहेत. त्यामुळे आम्हा दोघांच्या माध्यमातून तुमचे प्रश्न विधीमंडळात मांडले जाऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न होतील. पण, देशात रेशनकार्डच्या रंगावरुन धान्य देण्याचा प्रकार होत आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. रेशन दुकानदारांच्या प्रश्नाबाबत विधान परिषदेत आवाज उठवू.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नवीन योजनांमुळे दुकानदारांवर मर्यादा आल्या आहेत. त्यांच्या कमिशनचा विषय आहे. पण, साताऱ्यात आम्ही कोणावर ही अन्याय होऊ देत नाही. शासनाकडून किंवा प्रशासनाकडून अन्यायकारक भूमिका आली तर आपले मत शासनापर्यंत पोचवण्याचे काम सर्व आमदारांनी केले आहे. सत्तारुढ असो किंवा विरोधातील असो सर्वांनी काम केले आहे.

सातारा, जावळी मतदारसंघातील सर्व दुकानदार चांगल्या पद्धतीने व्यवहार करत असतात. डीबीटीसह अन्य योजना बाबत मी सत्तारुढ पक्षाचा आमदार म्हणून तुमच्या भावना अधिवेशनात मांडल्या असून त्या संबंधित मंत्र्यांपर्यंत पोचवल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणून योग्य निर्णय करुन दिल जाईल. ग्राहक व दुकानदारांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT