Solapur, 31 October : लोकसभा निवडणुकीनंतर कोमात गेलेल्या महायुतीला प्रथम लाडकी बहिण आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील बेबनाव पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरांपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडाळी झाली आहे. ही बंडखोरी महायुतीसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीतील मातब्बर नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आमदार प्रणिती शिंदे सोडता सर्व आमदार हे महायुतीच्या बाजूने होते. मागील निवडणुकीत एकट्या भाजपचे पाच, तर एक समर्थक आमदार निवडून आला होता. तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते, तर एका जागेवर शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या निवडून आल्या होत्या.
विधानसभेच्या विद्यमान निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठी बंडाळी झाली आहे. या मतदारसंघातून बहुतांश मातब्बर रिंगणात उतरले आहेत. महायुतीकडून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर परिवाराचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी, उद्योजक महादेव कोगनुरे, मागील निवडणूक लढवलेले बाबा मिस्त्री हे सर्व काँग्रेस समर्थक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस विचाराच्या मतांमध्ये फटाफूट होऊन भाजपचा फायदा होऊ शकतो.
पंढरपूर-मंगळवेढ्यातही महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना पक्षाने एबी फार्मही दिला आहे. मात्र, आरोग्य मंंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार समाधान आवताडे यांना दिलासा देणारी ही घटना आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावा, अशी माजी आमदार नरसय्या आडम यांची मागणी होती. मात्र, ते फेटाळून लावताना काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, आडम मास्तर यांनी माकपकडून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तौफिक शेख यांनीही बंडखोरी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट अटळ आहे. याशिवाय एमआयएमही मतविभागणीला खतपाणी घालणारे ठरणार आहे.
सांगोल्यातही महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. सांगोल्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र याठिकाणी महाविकास आघाडील बिघाडी महायुतीऐवजी शेकापला जास्त फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपचे विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या ठिकाणी युतीमधील मतांच्या विभागणीचा धोका नाकारता येत नाही. याशिवाय भाजपच्या माजी महापौरांनीही बंड केले आहे.
मोहोळ मतदारसंघातील ऐनवेळी बदलेल्या उमेदवारीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बसू शकतो. तसेच, याच पक्षाचे संजय क्षीरसागर यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून अडचणी आलेल्या यशवंत माने यांना दिलासा मिळाला आहे.
रणजितसिंह शिंदे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून महायुतीकडून मीनल साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे या ठिकाणी महायुतीमध्ये मतविभागणी होऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यातील विधानसभानिहाय उमेदवार
सोलापूर शहर उत्तर
विजयकुमार देशमुख (महायुती)
अमोल शिंदे (अपक्ष, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख)
महेश कोठे (महाविकास आघाडी)
शोभा बनशेट्टी (अपक्ष, माजी महापौर भाजप)
............................................
सोलापूर दक्षिण
सुभाष देशमुख (महायुती)
अमर पाटील (महाविकास आघाडी)
दिलीप माने (अपक्ष, माजी आमदार काँग्रेस)
धर्मराज काडादी (अपक्ष, काँग्रेस समर्थक)
बाबा मिस्त्री (प्रहार, बंडखोर काँग्रेस)
महादेव कोगनुरे (मनसे काँग्रेस समर्थक)
उमेश गायकवाड (शिवसेना बंडखोर)
...........................................
सोलापूर शहर मध्य
देवेंद्र कोठे (महायुती)
चेतन नरोटे (महाविकास आघाडी)
मनीष काळजे (अपक्ष, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख)
फारुख शाब्दी (एमआयएम)
तौफीक शेख (अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
नरसय्या आडम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)
अक्कलकोट
सचिन कल्याणशेट्टी (महायुती)
सिद्धाराम म्हेत्रे (महाविकास आघाडी)
.................................
मोहोळ
यशवंत माने (महायुती)
राजू खरे (महाविकास आघाडी)
सिद्धी कदम (अपक्ष)
संजय क्षीरसागर (अपक्ष)
...................................
माढा
अभिजीत पाटील (महाविकास आघाडी)
मीनल साठे (महायुती)
रणजितसिंह शिंदे (अपक्ष)
.......................................
करमाळा
नारायण पाटील (महाविकास आघाडी)
संजय शिंदे (अपक्ष)
दिग्विजय बागल (महायुती)
पंढरपूर-मंगळवेढा
भगीरथ भालके (महाविकास आघाडी काँग्रेस)
अनिल सावंत (महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस)
समाधान आवताडे (महायुती)
......................................
बार्शी
राजेंद्र राऊत (महायुती)
दिलीप सोपल (महाविकास आघाडी)
...........................
माळशिरस
राम सातपुते (महायुती)
उत्तम जानकर (महाविकास आघाडी)
................................
सांगोला
दीपक साळुंखे (महाविकास आघाडी उबाठा)
शहाजी पाटील (महायुती, शिवसेना)
बाबासाहेब देशमुख (शेकाप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.