Solapur, 31 October : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा. हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुटावा यासाठी चार नोव्हेंबर रोजी साेनिया गांधींची भेटणार आहोत, त्यामुळे आम्ही चार नोव्हेंबरपर्यंत वाट पाहू.
पण, चार तारखेपर्यंत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला न सुटल्यास आम्ही पाच नोव्हेंबर रोजी खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट करू. त्यात काँग्रेस पक्षाच्या चिंधड्या चिंधड्या उठतील, अशा शब्दांत मार्क्सवादी कम्यनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपला राग व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटल्याने नरसय्या आडम मास्तर नाराज आहेत. आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सुटावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. विशेषतः सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारारत सक्रीय सहभाग घेतला होता.
शिवाय सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी आडम यांच्याकडे पाठींबा मागितला होता. आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सुटणार असा दावा केला होता. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर तेव्हाही भाष्य केले नव्हते.
मध्यंतरी खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार या मतदासंघातून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे आडम मास्तर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसला इशारा दिलेला आहे.
आडम मास्तर म्हणाले, माकपच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य अशोक ढवळे यांचा बुधवारी रात्री मला फोन आला होता. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मिळविण्यासाठी चार तारखेपर्यंत प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. आम्ही येत्या चार तारखेला साेनिया गांधी यांना भेटणार आहोत. त्यामुळे मी चार तारखेपर्यंत वाट बघणार आहोत.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जागा न सुटल्यास पाच तारखेला मी जनतेच्या दरबारात महाविकास आघाडीत जी चर्चा झाली. लोकसभेला आम्ही जी मदत केली, त्या वेळी काँग्रेसचे पुढारी माझ्या घरी, कार्यालय आणि आमच्या पक्षाच्या संपर्कात राहून काहीही करा आम्हाला मदत करा, अशी विनंती कोणी केली होती. यासंदर्भात पाच तारखेला मी खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी गौप्यस्फोट करणार आहे, असा इशारा आडम यांनी दिला
आडम म्हणाले, निवडणुकीची आमची तयारी झालेली आहे. आमचे हजारो कार्यकर्ते फिरत आहेत. काँग्रेसवाल्यांना एकच इशारा देतो की, महाराष्ट्राचा हरियाणा होऊ देऊ नका. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ देऊ नका. लेाकसभेला ३१ जागा मिळाल्या, त्याच्या धुंदीत राहू नका. डावे पक्ष लहान असतील, त्यांची ताकद कमी असेल. पण ते प्रमाणिक आहेत.
महाविकास आघाडीला आवाहन करतो की, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी; अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील. ही जागा आम्ही कोणत्याही परिस्थिती जिंकू, असा दावा करून आडम म्हणाले, आतापर्यंत वीस लाख रुपयांची देणगी आमच्या पक्षाकडे जमली आहे. काँग्रेसने माघार घेतली नाही तर पाच तारखेला आम्ही नक्की बॉम्ब फोडू. आमची दिवाळी चार तारखेनंतर सुरू होईल, असेही आडम मास्तर यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.