ShankarRao Mohite Patil Cooperative Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil Bank : मोहिते पाटलांना धक्का; शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द, प्रशासक नेमण्याचा आदेश

Reserve Bank News : मोहिते पाटील बँकेकडे सध्या पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नाहीत. त्यामुळे, बँकिंग नियमन कायद्यानुसार तरतुदींचे पालन होत नाही. बँकिंग नियमन कायद्याचे पालन करण्यात शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंक अपयशी ठरली आहे, त्यामुळे ही बॅंक चालू राहणं, ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 April : राज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळख असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने 09 एप्रिल रोजी हा आदेश काढला असून त्यामुळे बॅंकेला शुक्रवारपासून (ता. 11 एप्रिल) काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बॅंक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अधिपत्याखाली होती.

दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank ) राज्यातील सहकारी संस्थांच्या निबंधकांना शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक बंद करून बॅंकेवर प्रशासक नेमण्यात यावा, असा आदेशही दिला आहे. त्यामुळे मोहिते पाटील बॅंकेवर लवकरच प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे, त्यामुळे ते दावा करू शकतात.

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंकेचा (Shankarrao Mohite Patil Cooperative Bank) ‘बॅंकिंग’चा परवाना रद्द करण्यामागील कारणेही रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केली आहेत. त्यात रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, मोहिते पाटील बँकेकडे सध्या पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नाहीत. त्यामुळे, बँकिंग नियमन कायद्यानुसार तरतुदींचे पालन होत नाही. बँकिंग नियमन कायद्याचे पालन करण्यात शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंक अपयशी ठरली आहे, त्यामुळे ही बॅंक चालू राहणं, ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक आहे.

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंकेची सध्याची परिस्थिती पाहता ती ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि मोहिते पाटील बँकेला तिचा बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली, तर ते सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम करणारे ठरेल, असा निष्कर्षही रिझर्व्ह बॅंकेने काढला आहे.

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे बॅंकेला आता बॅंकिंग व्यवसाय करण्यास मनाई असणार आहे, ज्यामध्ये दैनंदिन कामकाजाबरोबरच गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारणे आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची परतफेड करता येणार नाही. हा निर्णय शुक्रवारपासून (ता. ११ एप्रिलपासून) तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेला आहे.

मोहिते पाटील बॅंक अवसायनात काढल्यानंतर ठेवीदारांना विमा संरक्षण योजनेमुळे (डीआयसीजीसी) पाच लाख रुपयांपर्यंत दावा करता येणार आहे. विमा संरक्षण योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतची मदत ठेवीदारांना मिळू शकते. आकडेवारीनुसार, मोहिते पाटील बॅंकेच्या जवळपास ९९.७२ टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी डीआयसीजीसीकडून मिळण्याचा अधिकार आहे. दरम्यान ३१ मार्चपर्यंतच्या बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून मिळालेल्या संमतीच्या आधारे डीआयसीजीसीने एकूण विमाकृत ठेवींपैकी सुमारे ४७.८९ कोटी रुपयांचे याअगोदरच वाटप केले आहे.

दरम्यान, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंकेचा परवाना १९७५ मध्ये मिळाला होता. बॅंकेच्या प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात १९७८ पासून झाली होती. बॅंकेचे मुख्यालय अकलूज येथे होते, तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात तिच्या शाखा होत्या. त्यात अकलूज, टेंभुर्णी, करमाळा, इंदापूर, सोलापूर आणि पुणे यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT