
Kolhapur, 12 April : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा झालेला पराभव, विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश, चळवळीतील निष्ठावंत सवंगड्यांनी सोडलेली साथ आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीत घेतलेली स्वयंस्वार्थाची भूमिका यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाट अधिक खडतर बनली आहे. संघटनेतील बलवान आणि लोकप्रिय नेत्यांनी साथ सोडल्याने संघटनेची वाट आणखी अडचणीची बनली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात माजी खासदार राजू शेट्टी यांचा करिष्मा चालण्याची शक्यता कमीच आहे.
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Setkari Sanghatana) चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघात माजी आमदारांना जवळ केले. मात्र, नाराज झालेल्या संघटनेच्या आणि चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी संघटना आणि राजू शेट्टी यांची साथ सोडली.
मनमानी भूमिकेमुळे अनेकजण नाराज होत संघटनेपासून दूर झाले. प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, भगवान पाटील, यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यापासून दूर जाण्याला धन्यता मानली. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाल्याने त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला.
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी संघटनेत पक्षप्रवेश केला. पण, पराभव झाल्यानंतर मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडली. मिणचेकर यांच्यामुळे शेट्टी यांना वैभव कांबळे याच्यासारख्या चळवळीतील रांगड्या कार्यकर्त्याला गमवावे लागले.
खासदारकी गेली, विधानसभेत अपशय आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहण्यासाठी राजेश पाटील यांच्यासारखा प्रमुख चेहरा असलेला लोकप्रतिनिधीही राजू शेट्टी यांनी गमावला. राजेश पाटील आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य पद्माराणी पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला आहे.
राजेश पाटील हे हातकणंगले पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या 2017 च्या निवडणुकीत पद्माराणी पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. महत्त्वाचे म्हणजे पद्माराणी पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांकिता माने यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शेट्टी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला होता. मात्र, राजेश पाटील हे आता शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेत बळ मिळणार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सातत्याने शेतीप्रश्नांना वाचा फोडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळावेत, यासाठी त्यांनी पुणे-बेंगलोर महामार्ग रोखून धरला. अनेक दिवस कारखाने बंद राहिल्याने कारखानदराबरोबरच शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसला. कारखानदारांनी हमी दिली असली तरी अनेकांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शेट्टी यांनी आंदोलन केले, असा समज झाला. शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात शेट्टी यांच्याबद्दल नाराजीची भावना आहे.
शेतकरी चळवळीची भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या राजू शेट्टी यांना मनमानी स्वभावाचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसला, त्यामुळे जो शेतकरी शेट्टी यांच्या मागे होता. त्यांनीही आता अंग काढून घेण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संघटनेची वाट बिकट बनलेली आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.