Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Laxman Hake News : मागासवर्ग आयोगाच्या कामात हस्तक्षेप वाढल्याने राजीनामा दिला; हाकेंनी सांगितले कारण...

अरविंद मोटे

Solapur News : राज्यातील सर्व मागास समाजाचा सर्वे करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र ही मागणी अमान्य करण्यात आली. तसेच आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप वाढल्याने आपण आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला, अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिली. (Resigned due to increasing interference in work of Backward Classes Commission : Laxman Hake)

राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोगाच्या कामकाजावर सरकारचे निर्बंध असतील, तर आयोगाची स्वायत्ता धोक्यात येते. मागील अनेक दिवसांपासून मागासवर्ग आयोगाचे कामकाज समाधानकारक नसून आयोगाच्या सदस्यांमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. लक्ष्मण हाके हे जून २०२१ पासून राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वादळ उठलेले आहे. दुसरीकडे धनगर समाजाचीही अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच समाजाचा सर्व्हे करण्यात यावा, अशी भूमिका राज्य मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांची होती.

या भूमिकेला राज्य सरकारसह आयोगाच्या अध्यक्षांकडून विरोध होत आहे. आयोगाच्या कामकाजात प्रशासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप वाढल्याने आयोगाची स्वायत्तता धोक्यात आली आहे, असेही हाके यांनी स्पष्ट केले.

बालाजी किल्लारीकर यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले नाही तरी ईडब्ल्यूएससारखा विशिष्ट प्रवर्ग तयार करून आरक्षण देता येईल, अशी त्यांची भूमिका होती. पण सरकारच्या आणि आपल्या भूमिकेत फरक असल्याने राजीनामा दिल्याचे किल्लारीकर म्हणाले होते. यापूर्वी प्रा. डॉ. संजीव सोनावणे व लक्ष्मण माने यांनीही सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता चारशे कोटी रुपये देण्याची मागणी सरकारकडे केली होती. आता राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एकापाठोपाठ राजीनामे देत असल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रक्रियेचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोलापुरातील जनसुनवानी रद्द

प्रा. लक्ष्मण हाके आणि प्रा. डॉ. गोविंद काळे यांचा मंगळवारपासून (ता. ५ डिसेंबर) सोलापूर दौरा नियोजित होता. या दौऱ्यात ते जैनशिंपी, श्रावकशिंपी, सैतवाल, शेतवाळ, शैतवाळ, लोध, लोघा, लोधी या जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्याबाबत जनसुनावणी घेणार होते. तसेच, निऱ्हाळी, निलगार, निराळी या जाती एकच असल्याबाबतची जनसुनावणी होणार होती.

विठ्ठल मंदिर संस्थान व सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष पुणे यांच्या सोबत विठ्ठल मंदिर संस्थानमधील रिक्त पदांबाबतचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र, आता हाके यांनी राजीनामा दिल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT