Rohan Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohan Deshmukh : विधान परिषदेसाठी रोहन देशमुखांचे नाव पुढे : पुण्यातून सूत्रं हलली; मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिल्याची चर्चा

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू असून, युवा नेत्याच्या नावाची अचानक चर्चा वाढल्याने राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. सोलापूरसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र गेली दोन दिवसांपासून एका युवा नेत्याचे नावे वेगाने पुढे येताना दिसत आहे. विशेष म्हणजे या युवा नेत्याची सर्व सूत्रे पुण्यातून हलत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आज रात्री भेटीसाठी वेळ दिल्याची चर्चा आहे.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख (Rohan Deshmukh) यांचे नाव सोलापूर विधान परिषदेसाठी चर्चेत आले आहे. पुण्यात असणारे रोहन देशमुखांचा गेल्या काही दिवसांपासूनच सोलापुरातील वावर ठळकपणे दिसून येत आहे. मध्यंतरी सोलापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या घरी भेट दिली होती, त्या वेळी रोहन देशमुख आवर्जून उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही सोलापूरमध्ये (Solapur) आले होते, त्यावेळीही देशमुखांच्या घरी गेलेल्या बावनकुळेंच्या स्वागतासाठी रोहन देशमुख जातीने हजर होते.

मागच्या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही सोलापुरात आले होते, त्यावेळीही गडकरींनी आपले जुने सहकारी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती, त्या वेळी रोहन गडकरींच्या स्वागतासाठी हजर होते. म्हणजे या तीनही नागपूरच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी रोहन देशमुख उपस्थित असणे, हा योगायोग की राजकीय रणनीतीचा भाग होता, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री सुभाष देशमुख शांत दिसत असले तरी रोहन देशमुख यांच्या उमेदवारीसंदर्भातील सर्व सूत्रे पुण्यात हलत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत उमेदवारीसंदर्भात कोणाला भेटायचे, निवडणुकीची आणि उमेदवारी मिळविण्यासाठी रणनीती ठरविण्यात आल्याची चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वी ठरलेल्या रणनीतीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज भेटीची वेळ रोहन देशमुख यांच्याकडून मागण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांना आज रात्रीची वेळ दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्या भेटीतच उमेदवारीसंदर्भातील संकेत मिळण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे रोहन देशमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

रोहन देशमुख राजकीय निर्णय घेण्यास सक्षम : सुभाष देशमुख

रोहन देशमुख यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसंदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नाही. ते आपला राजकीय निर्णय घेण्याइतपत आता सक्षम झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयाबाबत मला काहीही माहिती नाही, असे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT