Dilip Mohite : ‘मला पाडण्यात अन्‌ तिकिट कापण्यात तुमची भूमिका...आता जे होईल ते होईल, कोणतीही किमत मोजायची तयारी...'

Dilip Walse Patil Vs Dilip Mohite : माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत उघड आव्हान दिले असून खेडमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
Dilip Mohite-Dilip Walse Patil
Dilip Mohite-Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune, 22 May : आमच्या विरोधात तुम्ही कायम भूमिका घेतलली आहे. विधानसभेच्या २०१४ निवडणुकीत मला पाडण्यात तुमचं किती योगदान होतं, हे सर्वांना माहिती आहे. तसेच २००९ मध्ये माझं तिकिट कापण्यात तुमची किती भूमिका होती, हेही माहिती आहे. तुम्ही सातत्याने खेडला विरोध करता आणि स्वतःची पोळी भाजून घेता. आमच्या जीवावर तुम्ही मंत्री झालात आणि आज तुम्ही आम्हाला नामशेष करायचा प्रयत्न करणार असाल तर तुमच्या विरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. जे होईल ते होईल, कोणतीही किमत मोजायला लागली तरी चालेल, अशा शब्दांत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना चॅलेंज दिले.

माजी आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) म्हणाले, भीमाशंकर देवस्थानमुळे खेड तालुक्याची ओळख आहे. या देवस्थानच्या नावाखाली खेड-आंबेगाव असं लिहियचं, असा निर्णय खेड आणि आंबेगावच्या आमदारांनी घेतला आहे. तालुक्यातील अनेकांनी त्यास विरोध दर्शविला असून माझाही तीव्र विरोध आहे. त्याची कल्पना देण्यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे.

भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यात अनादी काळापासून आहे. घाटरस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता करता आला नाही, तसेच वन विभागात शेकरू असल्यामुळे त्या जंगलात विकास कामांना प्रतिबंध करण्यात आला होता. दिलीप वळसे पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी तो रस्ता भीमाशंकरपर्यंत नेला, त्यानंतर सर्व कामं त्यांनी आंबेगाव तालुक्यात करायचं ठरवलं. पूर्वीच्या काळात असाच वाद उद्‌भवल्यावर वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि नारायणराव पवार यांच्यात शाब्दीक चकमकही झाली होती, त्यामुळे भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यातच राहिलं पाहिजे, असे मोहिते म्हणाले.

मी २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना पुण्यात डीपीडीसीच्या बैठकीला यायचं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ती आंबेगावमध्ये लावली. त्यानंतर ते सुरेश कौदरे यांच्या माध्यमातून देवस्थानचे अध्यक्ष झाले, पुढे ते १० वर्षे अध्यक्ष राहिले. त्या काळात मला त्यांनी उपाध्यक्षही होऊ दिलं नाही. भीमाशंकर देवस्थानचा सर्व निधी त्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये वापरला. वळसे पाटील यांनी देवस्थान आंबेगावात कसं नेता येईल, हेच पाहिले, असा आरोप मोहिते यांनी केला.

Dilip Mohite-Dilip Walse Patil
Rajendra Raut : राजेंद्र राऊतांचा 5 दिवसांपासून मुंबईत मुक्काम : मुख्यमंत्र्यांसह 3 बड्या नेत्यांची घेतली भेट; बार्शीत 'फिक्स आमदारकी'चे मेसेज व्हायरल

आम्ही काय नालायक होतो का?

माजी आमदार मोहिते म्हणाले, भीमाशंकर देवस्थान हायजॅक करण्याचा प्रयत्न वळसे पाटील यांनी अनेकदा केला. मी आमदार असेपर्यंत त्यांचं धारिष्ट्य होत नव्हतं. कारण मी त्यांच्यासोबत कायम वाद घालायचो. मध्यंतरी माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात वळसे पाटील यांनी बाबाजी काळे यांना उद्देशून ‘खेडच्या आजपर्यंतच्या आमदारांमध्ये हा सुसंस्कृत आमदार आहे,’ असं म्हटलं आहे. का तर तो त्यांचं ऐकतो. आम्ही काय नालायक होतो का?

आम्हाला नामशेष करणार असाल तर...

आम्ही पक्षात होतो, आमच्या जीवावर तुम्ही मंत्री झालात आणि तुम्ही अशी भाषा करत असाल तर तुम्ही कोणीही असा, आम्हाला काय फरक पडत नाही. आज तुम्ही आम्हाला नामशेष करायचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुमच्या विरोधात दंड थोपटले आहेत. जे होईल ते होईल, कोणतीही किमत मोजायला लागली तरी चालेल. आम्ही वळसे पाटील यांच्यासोबत बाबाजी काळे यांचाही निषेध करतो. खेडमधील जनतेला विश्वाससात न घेता अशी पावले उचलणार असाल तर आम्ही आंदोलन करू, अशा शब्दांत वळसे पाटलांच्या विरोधात मोहिते यांनी दंड थोपटले.

Dilip Mohite-Dilip Walse Patil
MLC Election : स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा चेंडू विभागीय आयुक्तांच्या कोर्टात; निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष, सोलापुरात 616 जण मतदान

अजितदादा त्यांना असल्या कोणत्या गोष्टी करू देत नव्हते

एका कालखंडात ज्येष्ठ नेते शरद पवारांचं ऐकलं. दादाचं ऐकलं. दादांची समन्वयाची भूमिका असायची. अजितदादा त्यांना असल्या कोणत्या गोष्टी करू देत नव्हते. तुम्ही असल्या कोणत्या गोष्टी वाढवू नका, असे ते सांगत असतं. पुन्हा ते वादाची ठिणगी टाकण्याचे काम करत असतील तर आम्ही संघर्षाला उभे आहोत, आता काहीही झालं तरी आम्ही आंबेगावचं शेपूट देवस्थानला जोडू देणार नाही. असा कुठलाही बोर्ड त्या परिसरात लावू देणार नाही. लावला तर काढून टाकला जाईल, असेही मोहिते स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com