Solapur, 25 May : रायगडावरील ६ जून रोजीचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा नामशेष केला पाहिजे, त्याऐवजी तिथीप्रमाणे शिवराज्यभिषेक दिन साजरा केला पाहिजे, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे, त्यावरून पुन्हा एकदा वादाचा धुराळा उडाला आहे. सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, रायगडावर सहा जूनला येणारी गर्दी रोखून दाखवावी, असे आव्हान भिडेंना दिले आहे.
सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार म्हणाले, संभाजी भिडेंचा (Sambhaji Bhide) मी निषेध करतो. स्वातंत्र्यापासून 06 जून रोजी शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. त्या दिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात रायगडावर येतात आणि शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा करतात. देशातील सर्व यंत्रणा ही तारखेवर चालते आणि हे म्हणतात तिथीनुसार करतात, ही मागणी निषेधार्थ आहे. संभाजी भिडेंचा वाढदिवस तिथीनुसार केला जातो का?
मुळात संभाजी भिडे हे शिवभक्तच नाहीत. ते जर खरे शिवभक्त असते तर त्यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकासंदर्भात सरकारला कधी जाब विचारला आहे का? जो प्रशांत कोरटकर राजमाता जिजाऊ आणि महाराजांविषयी बोलला आहे. त्यावर भिडेंनी कधी भाष्य केले आहे का? अशा लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. त्यांच्यात दम असेल त्यांनी सहा जूनला रायगडावर होणारी गर्दी अडवून दाखवावी. तुमचे चेलेचपाटे आणि तुम्ही रायगडवर सहा जून रोजी होणारी गर्दी अडवून दाखवावी, मगच मी तुम्हाला मानतो, असे आव्हान माऊली पवार (Mauli Pawar) यांनी भिडेंना दिले आहे.
भिडे यांच्यासारखी डुप्लीकेट लोकं महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचे काम करतात. त्यांच्यासोबत असणारी कट्टर शिवभक्त पोरं आहेत. पण, त्यांना दिशा नाही. दुर्दैवाने ती बहुजनांचीच पोरं आहेत. या लोकांची पोरं सगळी स्टडीमध्ये आणि आमच्या बहुजनांची पोरं कस्टडीमध्ये कशी राहतील, त्याचा प्लॅन करणारा हे संभाजी भिडे आहेत. त्यांचं वाक्य लय बेकार आहे. नामशेष...तुम्ही कोणाला नामशेष करता, आम्ही तुम्हाला नामशेष करून टाकू. शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा असं बोलणार असला, तर गाठ आमच्याशी आहे, असा दमही माऊली पवारांनी केले आहे.
सरकारला आमची विनंती आहे की, महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर संबंधितांवर सरकारने गुन्हा दाखल करावा. तसेच, वाघ्या कुत्र्याची समाधीही तेथून हटवली पाहिजे, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी केली आहे.
संभाजी भिडे हे मराठा आणि इतर बहुजनांच्या मुलांना भडकाविण्याचे काम करतात. त्यांना महाराष्ट्रात फिरू दिलं नाही पाहिजे. त्यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. मध्यंतरीच ते वाचले आहेत, मिरजेत त्यांच्यामुळेच दंगल पेटली होती. पण. आर. आर. पाटील यांच्या पुण्याईमुळे हे बाहेर आले आहेत, नाही तर ते मागंच मातीत गेले असते. आमचीच लोकं त्यांना वाचवतात. कारण काय तर हिंदू. हिंदू-हिंदू म्हणून ते सोळा मण सोन्याचे सिंहासन बनविण्यासाठी सोने गोळा करण्याचे काम करत आहेत. पण, ते सोने कुठे आहे. बहुजन समाजाच्या मुलांना भडकावून ते लूटमार करण्याचे काम करत आहेत. भिडे सोलापुरात आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, असे राजन जाधव यांनी म्हटले आहे.
विनोद भोसले म्हणाले, वादग्रस्त विधान करून समाज माध्यमांत प्रसिद्धी मिळविण्याचे काम संभाजी भिडे करत आहेत. शिवप्रेमींमध्ये बुद्धीभेद करण्याचे काम ते करत आहेत. मागेही त्यांनी तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राने महाराजांची जयंती तारखेप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे शिवराज्यभिषेक दिनाबाबत केलेले विधानही कोणताही शिवप्रेमी गांभीर्याने घेणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.