-- नागेश गायकवाड, प्रतिनिधी (सकाळ)
आटपाडी : चुलत्याच्या घरात किरकोळ चोरी केल्याच्या संशयावरून एका नराधम बापानं आपल्या दोन पोटच्या मुलींचे हातपाय बांधून त्यांना तब्बल दोन रात्री आणि एक दिवस घराच्या तुळईला लटकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वात थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे या अमानुष छळामध्ये नऊ वर्षांच्या ऋतुजा उर्फ सानिका दादू यमगर या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर ११ वर्षांची अनुजा ही मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी बाप दादू उर्फ नाना यमगर (वय ३८) याला चार मुली व एक मुलगा अशी एकूण पाच मुलं आहेत. दोन दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलींनी चुलत्याच्या घरात चोरी केल्याचा संशय दादूला होता. याबाबत त्यानं या मुलींकडं चौकशीही केली, मात्र मुली कबूल झाल्या नाहीत. या रागातून त्याने ऋतुजा आणि अनुजा या दोघींचे हातपाय बांधले आणि त्यांना घरातील छताच्या तुळईला अडकवून ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे, मुली खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत टांगलेल्या असताना आरोपी बाप आणि आई त्यांच्या खालीच झोपत होते.
तब्बल 36 तास या दोन्ही मुली लटकलेल्या अवस्थेत होत्या. या मुलींनी आपल्याला सोडावं तसंच पिण्याच्या पाणी द्यावं अशी अनेकदा विनवणी बापाकडं केली. मात्र, त्यांच्या बापानं पाण्याचा एक घोटही पिऊ दिला नाही. काल रात्री मुलींच्या आजोबांनी त्यांना सोडण्याचा आणि पाणी देण्याचा आग्रह केला तरीही बापाला पाझर फुटला नाही. त्याने स्वतःच्या वडिलांनाही टिकावाच्या दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, आज सकाळी दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्यांना खाली उतरवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत नऊ वर्षांच्या ऋतुजाचा मृत्यू झाला होता. तर अनुजा ही बेशुद्ध असल्याने तिला तातडीने आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इकडे गावात मृत ऋतुजावर अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच, शुद्धीवर आलेल्या अनुजाने घडलेला सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितला. त्यानंतर या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला.
या घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम बाप दादू यमगर याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच आपल्या लेकीचा जीव घेतल्याने संपूर्ण आटपाडी तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.