नेहा सराफ
Sangola politics : "भाजपचे सांगोल्यातलं वागणं हिडिस, किळसवाणं आणि एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा, अशा पद्धतीचं आहे. सांगोल्याची स्वाभिमानी जनता सहजासहजी कोणाचा दहशतवाद मान्य करणार नाही..." बोलायला मोकळे ढाकळे असणारे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सगळं बोलून गेले. त्याला कारण आहे, भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची रणनीती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जावोत नाहीतर अजून काही करो, भाजप काही थांबायला तयार नाही. तिकडे मुख्य नेते महायुती धर्म करत असताना दुसऱ्या फळीतील नेते हवी तशी सोयरीक करत आहेत. सांगोला नगरपरिषदही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच शहाजीबापू पाटील प्रचंड हतबल झाले आहेत.
सांगोला नगरपरिषद ३२ सदस्यांची. निवडणूक लागताच महायुती म्हणजे शिवसेना-भाजप एकत्र लढणार अशी भाषा झाली. त्यामुळे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वातील शेकाप विरुद्ध महायुती असा सामना फिक्स होता आणि घडलं मात्र भलतंच. शेकापने मारुती बनकर यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, निवडणूक जवळ येताच संपूर्ण चित्र पालटले.
शेकापकडून घोषित झालेले उमेदवार मारुती बनकर यांनी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनेही त्यांची अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केले. एवढेच नव्हे तर शेकापनेही लागलीच बनकर यांना पाठिंबा जाहीर केला. बापूंना गाफील ठेवून भाजप आणि शेकाप एकत्र आले आणि महायुतीची सहकारी शिवसेना विरोधक झाली.
याशिवाय भाजप आणि शेकापच्या उमेदवाराला माजी आमदार दीपक साळुंखे यांनी ही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहाजीबापूंची कोंडी झाली आहे. सांगोल्याच्या राजकारणात आजघडीला शहाजीबापू अगदी एकटे पडले आहेत. भाजपच्या नीतीने थंड झाले आहते. सांगोल्यात त्यांना राजकीय ट्रॅप करत भाजपने (BJP) त्यांच्याच विरोधात सेटिंग लावली आहे.
शेकापचे आमदार, गणपतराव देशमुख यांचे नातू असणारे डॉ. देशमुख यांनी भाजपसोबत जाणं अतिशय धक्कादायक आहे. कारण काहीही असलं भाजप आणि शेकाप यांचे विचार पूर्ण परस्पर विरोधी आहेत. असं असताना डॉ बाबासाहेब देशमुखांचा हा निर्णय त्यांचं राजकारण आणि लोकांचा विश्वास घात करणारा ठरू शकतो.
शिवाय शेकापच्या उमेदवाराने कमळ चिन्हावर लढणं म्हणजे स्वपक्ष स्वतःच्याच क्षेत्रात संपवण्यासारखं आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभेत देशमुखही कमळावर लढले तर फार आश्चर्य मानायला नको. पण देशमुख यांनी हा निर्णय जयकुमार गोरे यांच्यासोबत राहिलेल्या एका जुन्या हिशोबातून घेतल्याची चर्चा आहे.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आहेत सोलापूरचे पालकमंत्री. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा स्ट्राईक रेट दाखवायचा आहे. त्यासाठी ते आकाशपाताळ एक करत आहेत. जिंकण्यासाठी आवश्यक ती युती करण्याचा त्यांचा मानस असावा. शेवटी सत्ता येणं महत्वाचं आणि त्यासाठी गोरेंनी शेकापला जवळ केलं आहे.
सांगोल्याच्या भर चौकात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात गोरे मुद्दाम किंवा चुकून पण एक वाक्य बोलून गेले. त्यांनी सांगितलं की मी मदत केली नसती तर हे (बाबासाहेब देशमुख) आमदार झालेच नसते. याचाच अर्थ शहाजीबापू यांच्याविरोधात निवडणूक लढवताना बाबासाहेब देशमुखांना भाजपने विधानसभेत मदत केली. म्हणजे भाजपनेच शहाजीबापूंचा (Shahajibapu Patil) करेक्ट कार्यक्रम केल्याचं स्पष्ट आहे.
अजून एक मुद्दा म्हणजे कोणी कोणासाठी उगीच काही करत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, माढा लोकसभेसाठी या देशमुखांनी पण आतून रणजितसिंह निंबाळकरांना मदत केली. त्यामुळे विधानसभेला झालेली मदत ही त्यांनी लोकसभेला केलेल्या मदतीच्या बदल्यातच झाली असल्याचं बोललं जातंय.
आता याच मदतीचा पुढचा टप्पा सांगोला नगर परिषद निवडणूक आहे. तसे नसेल तर मग कमळाच्या चिन्हावर स्वपक्षीय उमेदवार लढवायला त्यांनी परवानगी दिलीच कशी हा प्रश्न आहे. त्यामुळे आता सांगोल्यात काय होणार, भाजप शेकाप युतीला यश मिळणार का? की शहाजीबापूंना सहानुभुतीचा फायदा होणार? हे बघावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.