Karad, 02 June : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काही वर्षांपूर्वी बोलण्याच्या ओघात धरणाच्या अनुषंगाने चुकीचे विधान गेले होते. त्या चुकीबद्दल अजितदादांनी (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी जाऊन प्रायश्चित घेतले होते. तशीच भावना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली आहे. ‘आयुष्यात यापूर्वी चुकून काही चुका झाल्या असतील, तर त्याची माफीही मागितली. तशी माफी मागण्यासाठीच मी कऱ्हाडला आलो, असे शिरसाटांनी मोकळेपणाने सांगितले.
सांगली येथील कार्यक्रमासाठी जाताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कराडला जाऊन (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) राज्यातील सर्वांचेच आदर्श आहेत. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन नतमस्तक झालो आणि त्यांना अभिवादन केले. आयुष्यात यापूर्वी चुकून काही चुका झालेल्या असतील, तर त्याची समाधिस्थळी माफीही मागितली. त्यासाठीच मी कऱ्हाडला आलो होतो, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिकांसह त्यांच्या विचाराला आणि मताला शिवसेनेत काडीचीही किंमत दिली जात नव्हती. त्यामुळेच शिवसेना पक्ष फुटला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष काढला होता. त्यांना राज ठाकरेंनाही पक्षात आणता आले नाही. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवा पक्ष काढला, त्यामुळे मनसे व शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येतील, अशी कोणतीही शक्यता वाटत नाही. सर्व निर्णय स्वार्थासाठी घेणाऱ्यांवर हीच वेळ येते, असा दावाही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, असे विधान करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत मंत्री शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात तब्बल 75टक्के हिंदी भाषिक मतदार आहेत, त्यामुळे सरनाईक यांचे ते विधान हे त्यांच्या मतदरारसंघापुरते मर्यादित आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि ती त्यांचीच राहील, यामध्ये तीळमात्र शंका नाही.
कॅगने सर्व यंत्रणेवर ठपका ठेवलेला आहे. तो फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवलेला नाही. पण ठपका ठेवलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. त्यातील दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
अजितदादांचे ते प्रायश्चित
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून इंदापुरातील एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात धरणाच्या अनुषंगाने चुकीचे विधान गेले होते. त्यावरून राज्यभरातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्याबद्दल अजित पवारांनी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी जाऊन प्रायश्चित घेतले हेाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.